अलंकापुरीत रंगला दहावीचे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
१९९४ - ९५ बॅचचे १०४ विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील भव्य दिव्य विकसित झालेल्या लक्षवेधी इमारतीत सन १९९४ – ९५ बॅचचे दहावीत शिकलेले १०४ विद्यार्थी या भव्य स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. यावेळी जुन्या आठवणींना सुजला देत मैत्री दिनाचे औचित्य साधून उत्साही आनंदी मंगलमय वातावरणात स्नेहमेळावा सुसंवादाने रंगला.
अलंकापुरीतील स्नेह मेळावा मैत्री दिनाचे औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये १९९४ / ९५ मध्ये शिकलेल्या आणि पास झालेल्या इयत्ता दहावीचे मुल्ला- मुलींनी विविध वेशभूषा करीत विद्यार्थ्यांचा लक्षवेधी गेट-टुगेदर स्नेहमेळावा उत्साहात विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला. या मेळाव्यामुळे ३० वर्षांनी जुने मित्र एकत्र आले. यावेळी जुने मित्र, मैत्रिणी भेटल्याचा आनंद चेहऱ्यावर होता.
या मेळाव्याची सुरुवात प्रथम माऊलींचे मूर्तीची पूजा, दर्शन, स्वागत पुष्पगुच्छ देत प्रवेशताना झाली. व्यासपीठावर श्रींची मूर्ती पूजा, दीप प्रज्वलन हरिनाम गजरात प्रमुख मान्यवरांचे हस्ते झाले. यावेळी स्वागत युवा उद्योजक सचिन येळवंडे यांनी उपक्रमाचा आढावा घेत केले. कसे घडलो, शिक्षक आणि समाज यांचे मार्गदर्शनातून प्रगतिशील वाटचाल करता आल्याचे सविस्तर विवेचन करीत उपक्रमाची माहिती दिली.
या प्रसंगी कीर्तनकार संग्राम बापू महाराज भंडारे, जिल्हा परिषद पुणे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, माजी सरपंच सोमनाथ मुंगसे, सुधाकर महाराज काटोले, शाळेतील माजी मुख्याध्यापक, अध्यापक, सेवा निवृत्त शिक्षकवर्ग, १९९४ – ९५ मधील बॅचचे विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, संग्राम बापू भंडारे यांनी मैत्री दिनाचे औचित्य साधत मेळावा होत असल्याचे सांगत जीवन जगत असताना मैत्रीचे महत्त्व खूप असल्याचे सांगितले. यावर प्रभावी मार्गदर्शन करीत संवाद साधला. यावेळी शाळेस पाच डायस भेट देत सामाजिक बांधिलकी जोपासली.
यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी आपल्या आठवणी व्यक्त करीत नव्या प्रदीर्घ वाटचालीतील कामाचा आढावा घेत एकमेकांशी संपर्क केला. यावेळी अनेकांच्या नेत्रांच्या कडा पाणवहल्या. या बॅच चे अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, उद्योजक, व्यवसायिक झाले असून विविध क्षेत्रात कार्यरत असून त्या बाबतच्या यशोगाथा, अनुभव सांगितले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गाण्यांची मैफल, आणि शिक्षकांचा सत्कार उत्साहात केला.
या मेळाव्याचे यशस्वीत्यासाठी उमेश रानवडे, अनिल थोरवे, अशोक थोरवे, दीपक वाबळे, लक्ष्मण उभे, शोभा मुसळे, माने ताई, गणेश कोद्रे, वृंदा गोतकुलवार यांचेसह बॅचचे सर्व मित्र यांनी परिश्रम पूर्वक केले. प्रास्ताविक रामदास वहिले यांनी केले. स्वागत सचिन येळवंडे यांनी केले. कॅप्टन वीरेंद्र गायकवाड, संतोषी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करत संवाद साधला. शाळेच्या जुन्या इमारती पासून ते वर्गातील आठवणी, सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा बालपण अनुभवत आनंद लुटला. सूत्रसंचालन विकास शिवले यांनी केले. आभार माजी सरपंच सोमनाथ मुंगसे यांनी मानले.