ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

सध्या जगाला युद्धाची नाही, बुद्धाच्या विचारांची गरज – उपमहापौर परशुराम वाडेकर

‘आर्य नागार्जुन संग्रहालया’चा रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न

Spread the love

पुणे  : बौद्ध इतिहास, संस्कृती आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या ‘आर्य नागार्जुन संग्रहालया’च्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सोहळा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिना’चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात संग्रहालयाच्या २५ वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाचा आढावा घेण्यात आला. तसेच संग्रहालयाच्या जतन, संवर्धन आणि विस्तारासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

बौद्ध इतिहास आणि संस्कृती संशोधन संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या संग्रहालयाची स्थापना ९ एप्रिल २००० रोजी झाली होती. गेल्या २५ वर्षांत संग्रहालयाने सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. या वेळी संग्रहालयाचे संस्थापक तथा ज्येष्ठ संग्राहक कै. दिलीप लक्ष्मण वानखेडे यांच्या ऐतिहासिक आणि दुर्मिळ संग्रह जतन करण्याच्या कार्यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमात पाली भाषेचे वरिष्ठ अभ्यासक, लिपीतज्ञ आणि लेणी संवर्धक मा. अतुल भोसेकर यांनी ‘बौद्ध संग्रहालयाची वैश्विकता’ या विषयावर विशेष व्याख्यान दिले. त्यांनी इतिहासकालीन दाखल्यांसह महान सम्राट अशोकांनी भारतातील पहिले बौद्ध संग्रहालय कशा प्रकारे उभारले, याविषयी माहिती दिली. संग्रहालयांचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “इतिहास आणि संस्कृती जिवंत ठेवण्यात संग्रहालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येकाने वेळोवेळी संग्रहालयांना भेट देऊन त्यांचे बारकाईने अवलोकन केले पाहिजे. लोकसहभागातूनच संग्रहालये जिवंत राहतात.”

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांनी संग्रहालयाच्या २५ वर्षांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. संग्रहालयाच्या विस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देताना त्यांनी जागतिक परिस्थितीवर भाष्य केले. “आज जगभर युद्धाचे सावट आहे. अशा परिस्थितीत महात्मा गौतम बुद्ध यांचे शांतता, करुणा आणि बंधुभावाचे विचारच मानवजातीला दिशा देऊ शकतात. सध्याच्या घडीला जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाच्या विचारांची गरज आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव मा. बाळासाहेब सावंत यांनी कै. दिलीप वानखेडे यांच्या ऐतिहासिक संग्रहकार्याचा गौरव करत संग्रहालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन वंदनीय भंते नाग दीपंकर महास्थवीर यांनी केले. त्यांच्या हस्ते बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संग्रहालयाच्या अध्यक्षा मा. कल्पना दिलीप वानखेडे यांनी प्रस्तावना व आभार प्रदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. दीपक मस्के यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन कुलदीप वानखेडे आणि हर्षवर्धन वानखेडे यांनी केले.

या वेळी स्त्रीभूषण रमाई आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, पुणे मनपाचे नगरसेवक निलेश आल्हाट, वसुंधरा भोसेकर यांच्यासह सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!