ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

Spread the love

 

पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची उपस्थिती लाभत असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून आध्यात्मिक मूल्ये, सकारात्मक विचार आणि राजयोग ध्यानाचा संदेश देण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी लक्ष्मी दीदी यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. शर्मिला बहनजी यांनी श्री गणेशाच्या विविध स्वरूपांमागील आध्यात्मिक रहस्ये आणि त्यातून मिळणाऱ्या जीवनमूल्यांची सविस्तर माहिती दिली.
श्री गणेशाच्या प्रत्येक अवयवामागे एक विशेष आध्यात्मिक संदेश दडलेला आहे, असे डॉ. शर्मिला बहनजी यांनी सांगितले. श्री गणेशाचे मस्तक हे दिव्य बुद्धीचे प्रतीक असून, मोठे कान हे प्रत्येकाचे शांतपणे ऐकून घेण्याचा संदेश देतात. डोळे एकाग्रता व योगाचे प्रतीक मानले जातात. त्याचप्रमाणे ‘लंबोदर’ या नावाचा अर्थ सर्व काही सामावून घेणारा, व्यापक मनाचा असा आध्यात्मिक संदेश त्यांनी स्पष्ट केला.
गणेशाच्या रूपाकडे केवळ धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीने न पाहता, त्यातील प्रतीकात्मक संदेश आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. संयम, विवेक, सकारात्मक दृष्टिकोन, एकाग्रता आणि सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती या गुणांचा अंगीकार केल्यास जीवन अधिक सुखी व संतुलित होऊ शकते, असा संदेश या विवेचनातून देण्यात आला.
यानंतर ब्रह्माकुमारी लक्ष्मी दीदी यांनी उपस्थितांना राजयोग मेडिटेशनचा अभ्यास करून मन:शांती, सकारात्मक विचार आणि अंतर्मुखतेचा अनुभव घेण्याचे आवाहन केले. राजयोगाच्या माध्यमातून मनाला स्थिरता देऊन स्वतःच्या आंतरिक शक्तींची जाणीव करून घेता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला माउंट आबू येथे आयोजित मीडिया कॉन्फरन्सला उपस्थित राहिलेले ज्येष्ठ पत्रकार संतोष सागवेकर, संगीता पाचंगे, पूजा पंडित, सुनीता कुमारी, किसन भोसले, संतोष महामुनी याप्रसंगी सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त करताना मीडिया कॉन्फरन्सदरम्यान आलेले अनुभव, मिळालेला आध्यात्मिक दृष्टिकोन आणि ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्रमातून मिळालेला सकारात्मक संदेश उपस्थितांशी शेअर केला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून धार्मिक श्रद्धेबरोबरच आध्यात्मिकता, आत्मचिंतन, सकारात्मक विचार आणि राजयोग ध्यानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आणि पत्रकारांच्या उपस्थितीमुळे ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रातील गणेशोत्सवाला विशेष स्वरूप प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!