पशुसंवर्धन विभागाच्या व्हॉट्सॲप चॅटबॉट व टेलिकन्सल्टेशन सेवेद्वारे ४१९८ टेलिकन्सल्टन्सी यशस्वीरित्या पूर्ण, पशुपालकांमध्ये समाधान

पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे-67
पशुपालकांना विविध पशुवैद्यकीय सेवांची उपलब्धता सहजपणे व्हावी यासाठी डिजिटल युगात एक पाऊल पुढे टाकत, आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप चॅटबॉट व ऑडिओ-व्हिडिओ टेलिकन्सल्टेशन सेवेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘१९६२’ या कॉलसेंटरच्या यशस्वी सुविधेत आता व्हॉट्सॲप चॅटबॉट व ऑडिओ-व्हिडिओ टेलिकन्सल्टेशनची भर पडल्यामुळे राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रणालीद्वारे मागील सहा महिन्यात ४,१९८ चॅट-बेस्ड टेलिकन्सल्टन्सी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या असून दोन्ही सेवांना पशुपालकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड व इंडसइंड बँक यांच्या सीएसआर फंडातून पशुसंवर्धन आयुक्तालय येथे कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. त्यामध्ये आता व्हॉट्सॲप चॅटबॉट व ऑडिओ-व्हिडिओ टेलिकन्सल्टेशन भर पडली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार, व्हॉट्सॲप चॅटबॉट व ऑडिओ-व्हिडिओ टेलिकन्सल्टेशन सेवेच्या माध्यमातून एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ (१५ सप्टेंबरपर्यंत) या कालावधीत तब्बल ४,९०७ चॅटबॉट संवाद साधले गेले आहेत. यामध्ये जनावरांचे संगोपन, आहार, प्रजनन तसेच विविध आजारांवर तातडीने सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय, या प्रणालीद्वारे ४,१९८ चॅट-बेस्ड टेलिकन्सल्टन्सी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
Google meet च्या माध्यमातून शेतकरी व पशुपालक प्रत्यक्ष video call द्वारे पशुवैद्यक तज्ज्ञांकडून पशुधनाच्या आजाराबाबत माहीती घेऊन तात्काळ उपचार घेतात. तसेच पशुधनाची पैदास, आरोग्य, चारा-चारा पिके व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना, विविध शासकीय योजना व शेळीपालन-कुक्कुटपालन-गाय-म्हैसपालन, भ्रूण प्रत्यारोपण आदींविषयी मोफत मार्गदर्शन घेतात. या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून घरबसल्या पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन, जनावरांच्या आजारांवर प्राथमिक उपचार व उपचारांचे ई-प्रिस्क्रिप्शन पशुपालकांसाठी उपलब्ध होत आहे. प्रारंभिक टप्प्यात कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात आलेली ही सेवा लवकरच २४ x 7 करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत.
ऑडिओ-व्हिडिओ टेलिकन्सल्टेशनचा वाढता ओघ:
दूरस्थ भागातील पशुपालकांसाठी व्हिडिओ व ऑडिओ कॉलद्वारे तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ला घेण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी ठरली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान एकूण ७,६२९ पशुधनासाठी ऑडिओ-व्हिडिओ सल्ला घेण्यात आला आहे. यामध्ये,
पशुपालकांना मिळालेला लाभ (पशुप्रजातीनिहाय):
o शेळी व मेंढ्यांसाठी सर्वाधिक २,४२३ वेळा सल्ला घेण्यात आला आहे.
o पोल्ट्री/कुक्कुटपालन क्षेत्रात ४,२५६ पशुपालकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
o गाय व म्हैस या पशुधनासाठी ८०८ वेळा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.
o कुत्रे, मांजरे व इतर पाळीव पशुपक्ष्यांसाठी देखील ही सेवा महत्त्वपूर्ण ठरली आहे.
जनावरांच्या लसीकरण व आरोग्यावर विशेष भर:
या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केवळ औषधोपचारच नव्हे, तर जनावरांचे लाळ्या खुरकूत (एफएमडी), आंत्रविषार (ईटीव्ही), घटसर्प (एचएस), पीपीआर यांसारख्या घातक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी नियमित जंतनाशक देणे व योग्य वेळेवर लसीकरण करण्याचे मोलाचे मार्गदर्शन पशुतज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. तसेच आवश्यकतेनुसार नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय, पॉलीक्लिनिक किंवा फिरत्या पशुवैद्यकीय पथकाकडे (मोबाईल व्हेटर्नरी युनिट – 1962) पाठवून वेळेवर उपचार सुनिश्चित केले जात आहेत. या उपक्रमाचे संनियंत्रण सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. दत्तात्रय गाडे हे यशस्वीपणे करीत आहेत.
“आजच्या डिजिटल युगात पशुपालकांच्या दारात आधुनिक पशुवैद्यकीय सेवा पोहोचवणे हे आमचे मुख्य धोरण आहे. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेला व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि टेलिकन्सल्टेशन उपक्रम ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी वरदान ठरत आहे. अगदी दुर्गम भागातूनही केवळ एका क्लिकवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ई-प्रिसिक्रिप्शन व जनावरांच्या उपचाराची दिशा मिळत असल्याने जनावरांचे आरोग्य राखणे अधिक सुलभ झाले आहे. या सुविधेमुळे वेळेवर उपचार व लसीकरण शक्य होत असून, राज्यातील दुग्धव्यवसाय व पशुधन समृद्धीच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. सर्व पशुपालक बांधवांनी या डिजिटल सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा.”
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-67
“पशुधनाचे आरोग्य आणि रोग नियंत्रण हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आमच्या विभागाने सुरू केलेल्या ऑडिओ-व्हिडिओ टेलिकन्सल्टेशन आणि चॅटबॉट प्रणालीच्या माध्यमातून एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या अल्प काळातच ७ हजारांहून अधिक जनावरांना तातडीचा वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन मिळवून दिले आहे. लाळ्या खुरकूत, आंतविषार, घटसर्प यांसारख्या संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित लसीकरण, जंतनाशके व योग्य आहार व्यवस्थापनाबाबत पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. ही यंत्रणा आपत्कालीन स्थितीत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. पशुआरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आमचा विभाग कटिबद्ध आहे.”
डॉ. शैलेश केंडे, सहआयुक्त पशुसंवर्धन (पशुआरोग्य व रोगनियंत्रण), महाराष्ट्र राज्य, पुणे-67



