देश / विदेशब्रेकिंग न्यूज़मराठी

सेवा सेतू अभियान : १७५० वीजग्राहकांची सौर ऊर्जेला पसंती

१७२ ठिकाणी ‘किऑस्क’; ३४६३ नागरिकांनी दिली भेट

Spread the love

पुणे,: वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सौरऊर्जा योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि अर्ज प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा सेतू अभियाना’ला पुणे परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे परिमंडलात १७२ ठिकाणी उभारलेल्या किऑस्कला आतापर्यंत तब्बल ३४६३ नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली, तर १७५० ग्राहकांनी छतावरील सौर प्रकल्पासाठी अर्ज केले आहेत.पुणे व पिंपरी-चिंचवड या महानगरांत विविध वॉर्डमध्ये, तर ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी सेवा सेतू अभियानांतर्गत महावितरणने किऑस्क उभारले आहेत. या ठिकाणी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० याबाबत नागरिकांना माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, अनुदान व आर्थिक लाभ, सौर संचाची क्षमता, अंदाजित खर्च, कर्ज सुविधा तसेच अधिकृत सौर कंत्राटदारांबाबत माहिती किऑस्कवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सूर्यघर योजनेंतर्गत १ किलोवॅटला ३० हजार, २ किलोवॅटला ६० हजार, तर ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांचे अनुदान मिळते. ज्या वीजग्राहकांचा मासिक वीज वापर १०० युनिटच्या आत आहे, अशा ग्राहकांना स्मार्ट योजनेतून लाभ घेता येतो. त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० हजार, अनुसूचित जाती-जमातींसाठी ५ हजार, तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना केवळ २५०० रुपयांत १ किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प घराच्या छतावर लावता येतो. १ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सरासरी १२० युनिट वीज दरमहा तयार होते. यामुळे ग्राहकांचे वीजबिल शून्य होण्यास मदत होते.

महानगरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून सर्वाधिक ७२४ अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ गणेशखिंड शहर मंडलातून ६१४ व रास्तापेठ शहर मंडलातून ४१२ अर्ज सौरप्रकल्पासाठी प्राप्त झाले आहेत. हे किऑस्क १७ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांनी जवळच्या किऑस्कला भेट देऊन प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना तसेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!