महिलांनी फोडली अन्यायाची प्रतीकात्मक दहीहंडी
अभिनेत्री श्रुती मराठे यांची उपस्थिती ; सोमवार पेठेत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड.नितीन परतानी यांच्या वतीने आयोजन

पुणे : सर्वत्र मोठ्या प्रमाणात महिलांवर सुरु असलेल्या अत्याचाराचा पुण्यात अभिनव पद्धतीने निषेध करीत महिलांनी अन्यायाची प्रतीकात्मक दहीहंडी फोडली. सोमवार पेठेतील रास्ते वाडा चौकात आयोजित काँग्रेसच्या दहीहंडीमध्ये ही हंडी फोडण्यात आली.
यावेळी अभिनेत्री श्रुती मराठे, काँग्रेस चे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मुख्य आयोजक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड.नितीन परतानी, नीलम परतानी आदी उपस्थित होते. कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाच्या महिलांनी ही दहीहंडी फोडली. वारजे येथील मोरया प्रतिष्ठान वाद्य पथकाने ढोल ताशा वादन केले.
श्रुती मराठे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचाराच्या बाबत आपण काहीतरी करणे गरजेचे आहे. त्यामुळे दहीहंडी सारख्या उत्सवातून मांडलेल्या या महिलांशी संबंधित विषयाला आपण पाठिंबा द्यायला हवा.
ॲड.नितीन परतानी म्हणाले, राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे आज महिलांवरील अन्यायाची प्रतीकात्मक दहीहंडी करण्यात आली. हि हंडी महिलांनीच एकजुटीने फोडली. महिला एकजूट आणि अन्यायाला प्रतिकार करण्यास आम्ही सज्ज आहोत, असा संदेश महिलांनी यनिमित्ताने दिला.