‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ वरिष्ठ गट मुलींची फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२५ !!
पुणे जिल्हा महिला संघाला विजेतेपद !!

पुणे, : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ वरिष्ठ मुलींच्या गटाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा महिला संघाने आपले अपराजकत्व कायम ठेवत मुंबई जिल्हा संघाचा २-१ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पालघर येथील पालघर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मैदानावर चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पुणे पुणे संघाच्या महिला खेळाडूंनी मुंबई संघावर संघर्षपूर्ण विजय मिळवला. पुणे आणि मुंबई या दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला. १२ व्या मिनिटाला पुण्याच्या गोलकक्षामध्ये मुंबईच्या आघाडीच्या फळीने मुसंडी मारली. यावेळी पुण्याच्या रक्षकफळीतील खेळाडू आणि गोलरक्षक यांच्यातील समन्वय चुकला आणि मुंबईच्या निशीका प्रकाश हिने संधीचा अचूक फायदा घेत गोल नोंदविला आणि संघाचा खाते उघडले. यानंतर पुण्याच्या संघाने पिछाडीवरून जोरदार खेळ केला, परंतु त्यांना मिळालेल्या संधीचे गोलामध्ये रूपांतर करता आले नाही. पुर्वार्धामध्य मुंबई संघाकडे १-० अशी आघाडी होती.
उत्तरार्धात पिछाडीवरून पुण्याच्या संघाने आक्रमण अधिक तीव्र केले. मुंबई संघाने आघाडी मिळल्याने बचावावर अधिक जोर देत आघाडी टिकवून ठेवण्याची योजना आखुन खेळ केला. यावेळी ५६ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवरती पायल कोठारी हिने उत्तम फायदा करून घेतला. मुंबईच्या गोलकक्षाजवळील २५ यार्डावरून पायल हिने अचूक निशाणा साधून गोलाचा वेध घेतला आणि सामन्यामध्ये १-१ अशी बरोबरी निर्माण केली. अखेरच्या मिनिटांपर्यंत ही बरोबरीची कोंडी कायम होती. ९० व्या मिनिटाला मुंबई संघाच्या गोलकक्षात (डीमध्ये) पुण्याच्या खेळाडूंनी मुसंडी मारली. यावेळी रितिका सिंग हिने सेनोरिटा नाँगपॉय हिला पास देऊन गोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुंबईच्या रक्षकफळीतील खेळाडूने सेनोरिटाला चुकीच्या पद्धतीने अडविले. त्यामुळे पंचांनी पुणे संघाला पेनल्टी बहाल केली. या पेनल्टीवर रितीका सिंग हिने अचूक गोल करून संघाला २-१ अशा विजयासह विजेतेपद मिळवून दिले.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पुणे संघाच्या रितिका सिंग हिला मिळाला. सर्वोत्कृष्ट रक्षक खेळाडू पुण्याची प्रेरणा मेश्राम हिला पुरस्कार देण्यात आला. यासह सर्वाधिक गोल मारणारा खेळाडू (गोल्डन बुट) सोमय्या शेख (अहमदनगर जिल्हा) हिला हा मान देण्यात आला.
सामन्याचा सविस्तर निकालः अंतिम फेरीः
पुणे जिल्हाः २ (पायल कोठारी ५६ मि., रितिका सिंग ९० मि. पेनल्टी) वि.वि. मुंबई जिल्हाः १ (निशीका प्रकाश १२ मि.);



