खेलब्रेकिंग न्यूज़मराठी

खेळाडू व प्रशिक्षक एकाच कुटुंबाचे सदस्य’ !! “शिस्त व वक्तशिरपणा महत्त्वाचा” !!

डेक्कन इलेव्हनचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !!

Spread the love
पुणे दिनांक २३- ‘खेळाडू व प्रशिक्षक हे एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत व त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवला तर निश्चितपणे फुटबॉलमध्ये चांगले यश मिळू शकते असे भारतीय महिला फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रिस्पीन छेत्री व १७ वर्षाखालील मुलांच्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बिबियानो फर्नांडेझ यांनी सांगितले. शिस्त व वक्तशीरपणा हे खेळाडूच्या जीवनातील महत्त्वाचे घटक आहेत असे भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार व गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू आणि बचावरक्षक राहुल भेके यांनी आपले मत व्यक्त केले.

डेक्कन इलेव्हन या ख्यातनाम फुटबॉल संघाचा ४० व्या वर्धापन दिनानिमित्त फुटबॉल विषयक संवाद पीवायसी हिंदू जिमखाना येथे आयोजित करण्यात आला होता. या संवादात या चारही व्यक्तींनी भारतीय फुटबॉल क्षेत्र व परदेशातील संधी याविषयी आपले विचार मांडले. यावेळी पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष व आमदार डॉ.विश्वजीत कदम,आमदार सिद्धार्थ शिरोळे हे यावेळी उपस्थित होते. यावेळी डेक्कन इलेव्हनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश अडिगे, संचालक मंदार ताम्हाणे यांनीही आपले विचार व्यक्त केले. या संस्थेचे संचालक अनिल व सुनील देशपांडे, राजेश भोसले हेही उपस्थित होते. ख्यातनाम संवादिका वैदेही वैद्य यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. या समारंभास माजी खेळाडू, सध्याचे सर्व गटाच्या संघातील खेळाडू त्यांचे पालक असा सुमारे ४०० लोकांचा डेक्कन इलेव्हन चा परिवार उपस्थित होता. सर्वांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्राविषयी, भारतीय राष्ट्रीय संघांविषयी आणि तळागाळापासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भारतीय फुटबॉल क्षेत्राला प्रगती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींवरअतिशय मौल्यवान विचार ऐकावयास मिळाले. वक्त्यांनी मांडलेल्या विचारांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली.

खेळाडू, प्रशिक्षक व फुटबॉल संघटक यांना फुटबॉल या खेळाचा बारकाईने अभ्यास करण्याची आवश्यकता असते तरच ते त्यांच्या कार्यात यशस्वी होतात असे सांगून फर्नांडेझ यांनी म्हणाले,” बरीच वर्षे खेळाडू म्हणून करिअर केल्याचा फायदा मला प्रशिक्षक म्हणून काम करताना झाला आहे. सराव करताना खेळाडूंना त्या खेळाचा आनंद घेता येईल तसेच सरावाच्या पद्धती अधिकाधिक सोप्या होतील हा दृष्टिकोन मी ठेवला आहे. मुख्य म्हणजे खेळाडू व प्रशिक्षक यांनी एकमेकांवर विश्वास ठेवला तर दोघांमधील संवाद अधिक चांगल्या रीतीने होतो. त्यामुळे खेळाडू यशस्वी होतो. आपल्यावर संघाच्या यशस्वितेची जबाबदारी आहे हे ओळखून खेळाडूंनी त्याप्रमाणे आपली भूमिका पार पाडली पाहिजे.

छेत्री यांनी सांगितले,” महिलांना फुटबॉल सारख्या आव्हानात्मक खेळात करिअर करताना अनेक अडचणी येतात. विशेषतः त्यांच्या आरोग्याच्या अडचणी तसेच महिला म्हणून खेळताना अन्य लोकांकडून होणारी टीका यालाही त्यांना सामोरे जावे लागते. वरिष्ठ संघात स्थान मिळवून दोन-तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर आपल्याला नोकरी कशी मिळेल हा त्या विचार करीत असतात व नोकरी मिळाल्यानंतर त्या आपल्या करिअरकडे गांभीर्याने पाहत नाहीत. तसेच विवाह झाल्यानंतर करिअर सुरू ठेवणाऱ्या फारच कमी महिला असतात त्यामुळेच महिला संघास प्रशिक्षण देताना आमच्यासारख्या प्रशिक्षकांना अनेक आव्हाने पार करावी लागतात ‌”

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळवल्यानंतरही मला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र मी निराश न होता नॉर्वे येथे तीन महिने प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो. भारतीय संघात आपल्याला पुन्हा स्थान मिळेल हा आत्मविश्वास मी ठेवीत तेथे एकाग्रतेने सराव केला. दरम्यानचे काळात भारतीय संघाच्या प्रशिक्षकांमध्ये बदल झाला आणि नवीन प्रशिक्षकांनी पुन्हा मला संधी दिली एवढेच नव्हे तर भारतीय संघाचा कर्णधार म्हणूनही माझ्याकडे जबाबदारी सोपविली. सांगायचे तात्पर्य हेच की अपयशाने खचून न जाता जिद्दीने सराव करीत ठेवा म्हणजे यश तुमच्या पायाशी लोळण घेते असे गुरप्रीत सिंग याने सांगितले.

शाळेकडून फुटबॉल खेळत असताना आमच्या प्रशिक्षकांनी खेळाडूंनी डोळे, कान व मन उघडे ठेवले पाहिजे त्यामुळे तुम्हाला शिकायला भरपूर मिळते ही शिकवण आम्हाला दिली होती. त्याचा फायदा मला राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी झाला.  आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक खेळाडू व्हायचे आहे हे ध्येय मी ठेवले होते व त्यानुसारच मी एकाग्रतेने खेळलो. त्यामुळेच मला नावलौकिक मिळाला आहे असे भेके याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!