जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी घडविल्या गणेशमूर्ती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि आर्ट आंगण च्यावतीने आयोजन ; योजनेतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : मातीच्या गोळ्यापासून आपल्या मनातील लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती घडविण्याचा अनुभव घेत जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविल्या. पर्यावरणाचे रक्षण करू… पर्यावरणपूरक मूर्तीचे पूजन करू… असे सांगत ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ साजरा करण्याचा संदेशच विद्यार्थ्यांनी दिला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि आर्ट आंगण यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत झालेल्या या कार्यशाळेत योजनेत असलेल्या विविध शाळांतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी ट्रस्टच्या पालकत्व योजनेतील संस्कार वर्गाचे प्रमुख विजय भालेराव, शैक्षणिक विभाग प्रमुख मोहित चांदोरीकर, आकाश आवटे, पर्यवेक्षिका विद्या अंबर्डेकर, गौरी शिंदे, शुभदा देशपांडे, स्नेहा वावीकर, अंकिता शिळीमकर, नम्रता पड्याल, आर्ट आंगण तर्फे मानसी चौधरी, प्रतीक गायकवाड आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.