पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ उभारणीचा ‘‘श्रीगणेशा’’
- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

– राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांचा जागा उपलब्धतेस हिरवा कंदील
पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
उद्योग नगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि ऑटो हब अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता देशातील नामांकित भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM-नागपूर) ची शाखा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वत्र गणेश आगमनाचा उत्साह सुरू असतानाच शहरात आता आयआयएम सारखी नामांकीत संस्था सुरू करण्याचा ‘‘श्रीगणेशा’’ झाला आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील देत ७० एकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचा हा ‘‘ड्रीम प्रोजेक्ट’’ आता दृष्टीक्षेपात आला आहे.
शहरातील मोशी येथील गट क्रमांक ३२५ मधील शासकीय गायरान जमिनीवर आयआयएमची शाखा उभारली जाणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडच्या लौकीकात आणखी भर पडणार असून, औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार आहे. याआधी त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची शाखा सुरू करण्यासाठी आमदार लांडगे पुढाकार घेतला होता आणि त्याला यश मिळाले. आता आयआयएम-नागपूरची शाखा सुरू करण्याचे स्वप्न साकार होत आहे.
औद्योगिक नगरीत आयआयएमची शाखा सुरू झाल्यास रोजगार, संशोधन आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील. देशभरातील विद्यार्थी पिंपरी-चिंचवडमध्ये येतील, उद्योगजगताशी थेट संपर्क साधला जाईल आणि शहराची शैक्षणिक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
***