पुण्यातील गणेश विसर्जनासाठी टाटा ब्लूस्कोप स्टीलचा पर्यावरणपूरक पुढाकार
- गणेशोत्सव अधिक पर्यावणपूरक साजरा करण्यासाठी ‘श्री गणेश विसर्जन व्हॅन’

– महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्सजेंडर ‘शिखंडी ढोल ताशा पथक’ कडून पारंपरिक ढोल ताशा वादन
पुणे – गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संवर्धन आणि समाजातील सर्वसमावेशक घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी टाटा ब्लूस्कोप स्टीलने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत कंपनीने ‘इको विसर्जन मोबाईल व्हॅन’ सुरू केली असून, या व्हॅनद्वारे पुण्यातील प्रमुख ठिकाणी श्री गणेशमूर्तींच्या सुविधाजनक आणि पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
खास तयार करण्यात आलेल्या या मोबाइल व्हॅनमध्ये पाण्याची टाकी आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करता येईल. ही व्हॅन महत्त्वाच्या विसर्जनाच्या दिवशी प्रमुख ठिकाणी कार्यरत असेल. या व्हॅनमध्ये आकर्षक उपक्रमांचाही समावेश असेल. त्यामध्ये कलाकार आपल्या नावांचा वापर करून गणपती मूर्तींची झटपट रेखाचित्रे तयार करून ती लोकांना देईल.
तसेच या उपक्रमाला अधिक अर्थपूर्ण दिशा देत टाटा ब्लूस्कोप स्टीलने ‘शिखंडी ढोल ताशा पथक’ या महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथकाशी सहयोग केला आहे. या पथकाच्या वादनातून समाजातील सर्व घटकांच्या सर्वसमावेशकतेचा संदेश देण्यात येणार आहे. हे पथक पुण्यातील अनेक प्रमुख ठिकाणी सादरीकरण करणार आहे. या सहयोगामुळे उत्सवाच्या काळात अधिक उत्साह आणि सहभाग वाढतोच, शिवाय सामाजिक समता आणि स्वीकार यांचे महत्त्वदेखील अधोरेखित होते.
या उपक्रमाबद्दल टाटा ब्लूस्कोप स्टीलच्या प्रमुख मार्केटिंग अधिकारी प्रिया राजेश म्हणाल्या, “गणेशोत्सव हा भक्ती, आनंद आणि परंपरेचा सण आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही पर्यावरणपूरक पद्धतींना पुढे नेताना पुढील पिढ्यांसाठी निसर्गाचे रक्षण करण्याच्या जबाबदारीने सण साजरा करण्यास प्रोत्साहन देऊ इच्छितो. ‘इको विसर्जन मोबाईल व्हॅन’ लोकांसाठी सोयीचे ठरेलच, शिवाय उत्सवाचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी एक छोटे परंतु महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्याचबरोबर शिखंडी ढोल ताशा पथकाशी सहयोग करून आम्ही सर्वसमावेशकतेची भावना अधोरेखित करत आहोत आणि विविधतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना व्यासपीठ देत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. या एकत्रित प्रयत्नांतून जबाबदार, सन्मानपूर्वक आणि सर्वांना समृद्ध करणाऱ्या उत्सवाप्रति असलेली आमची बांधिलकी दिसून येते.” ड्युराशाइन ब्रँडअंतर्गत राबविण्यात आलेल्या हा उपक्रम टाटा ब्लूस्कोप स्टीलची निसर्ग सवंर्धन, सामाजिक सहभाग आणि सामाजिक जबाबदारीबद्दल असलेली बांधिलकी अधोरेखित करतो. या उपक्रमामुळे गणेशोत्सव आनंद, सर्वसमावेशकता आणि पर्यावरणाचा सन्मान राखत साजरा होईल.