ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार माजी प्राचार्य कृष्णराव पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, स्व. बबनराव तळेकर यांना जाहीर
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या हस्ते होणार प्रदान

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक – अध्यक्ष शिवनेर भूषण शिक्षण महर्षि स्व. विलासराव तांबे यांच्या ७८ व्या जयंती निमित ‘ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कारा’ चे वितरण करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा डुडुळगाव ( आळंदी ) पुणे येथील ज्ञानविलास कॉलेज ऑफ इंजिनियरींग, येथे दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ह.भ.प. पुरुषोत्तमदादा महाराज पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होत आहे. सोहळ्यास प्रमुख उपस्थिती विघ्नहर सह. सा. कारखान्याचे संचालिका श्रीमती निलमताई विलासराव तांबे, अध्यक्षस्थानी गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष तथा पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक, माजी अध्यक्ष स्थायी समिती पुणे विशाल तांबे राहणार आहेत. या प्रसंगी संचालक श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी प्राचार्य कृष्णराव शंकरराव पाटील, आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, तसेच स्व. बबन अनंता तळेकर (मरणोत्तर) अशी पुरस्कारार्थ्यांची नावे आहेत. मानपत्र, शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्कारचे स्वरूप आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव वैभव तांबे यांनी दिली.