कस्तुरे चौक गणेशोत्सव मंडळाने गणेशभक्तांना दिले देशी झाडांचे प्रसादरुपी बीजगोळे
कार्यकर्त्यांनी देशी झाडांचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनाचा केला संकल्प

पुणे : पूर्व भागातील कस्तुरे चौक गणेशोत्सव मंडळाने वेगळा उपक्रम राबवत गणपती बघायला येणाऱ्या भाविकांना प्रसादासोबत देशी झाडांचे बीज गोळे दिले. यासोबतच देशी झाडांच्या बिया देखील वाटण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी देशी झाडांचे रोपण आणि संवर्धनाचा संकल्प करत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही त्याचे महत्त्व पटवून दिले.
मंडळातर्फे १ हजार हून अधिक बीज गोळे आणि देशी झाडांच्या बिया गणेश भक्तांना देण्यात आले आहेत. यावेळी राजेश होनराव, वनेश गोरले, अभिजित मानकर, दिपक कोंढरे, बाबा सट्टे, सुयश भगत, योगेश येनपुरे, धनराज राठी, ऍड.उमेश झाडे, बंटी मोटे, संजय धांडे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष राजेश होनराव म्हणाले, सध्या देशी झाडांचे प्रमाण कमी होत चालले आहे. शोभेची झाडे लावली जातात; पण पिंपळ, वड, आंबा, बाभूळ, कडुलिंब, चिंच यांसारखी उपयुक्त देशी झाडे सहसा कोणी लावत नाही. ही झाडे केवळ सावली, ऑक्सिजन आणि औषधी गुणधर्मासाठीच नव्हे तर पक्षी व प्राण्यांसाठीही उपयुक्त ठरतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे देशी झाडांचे बीज गोळे देण्यात आले आहेत.