दगडूशेठ’ गणपतीसमोर ‘गणेशोत्सव २०२५’ या विषयावर विशेष कॅन्सलेशन प्रकाशित
भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र सर्कल तर्फे आयोजन ; महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग यांची उपस्थिती

पुणे : भारतीय डाक विभागाने राष्ट्रीय सण, संस्कृती व वारसा टपाल तिकिटे आणि विशेष कॅन्सलेशनद्वारे साजरा करण्याची अविरत परंपरा सुरू ठेवली आहे. यंदा ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र सर्कल च्या वतीने ‘गणेशोत्सव २०२५’ या विषयावर विशेष कॅन्सलेशन प्रकाशित करण्यात आले. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासोबतच ट्रस्टच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे विशेष कॅन्सलेशन जारी करण्यात आले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग, डाक सेवा पुणे विभागाचे निदेशक अभिजीत बनसोडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अमिताभ सिंग म्हणाले, ‘गणेशोत्सव २०२५’ या विषयावर विशेष कॅन्सलेशन व मोहोर ही प्रत्येक चिठ्ठीला लावण्यात येईल. यामध्ये श्री गणेशाचे चित्र साकारण्यात आले आहे. प्रख्यात कॅलिग्राफीस्ट अच्युत पालव यांनी हे चित्र साकारले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने जे महान कार्य सुरु आहे, ते प्रत्येकापर्यंत यामाध्यमातून पोहोचणार आहे. ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या सन्मानार्थ हा उपक्रम येथे घेण्यात आला.
भारतीय डाक विभागाचा हा उपक्रम देशभरातील लाखो भाविकांना एकत्र आणणाऱ्या या उत्सवाचे स्मरण करण्यासाठी आहे. टपाल तिकिटे खरेदी करणारे आणि सामान्य जनता हे विशेष कॅन्सलेशन पुणे येथील फिलाटेली ब्युरो, पुणे मुख्य टपाल कार्यालय ४११००१ येथे मिळवू शकतात.