देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या कोथरूड-कर्वेनगर शाखेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

पुणे : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या कोथरूड-कर्वेनगर शाखेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आज (दि. 5) उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या माध्यमातून समाज आणि समाजबांधवांच्या हितासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करीत सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही पाटील यांनी या प्रसंगी दिली.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या सचिव केतकी कुलकर्णी यांच्या पुढाका रातून कोथरूड, कर्वेनगर परिसरातील पितृछाया बंगला, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ आवश्यक सोयीसुविधांनी युक्त कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांनी फित कापून केले. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र गंधे, मुबंई शाखेचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, कार्यवाह मिलिंद सरदेशमुख, आनंद कुलकर्णी, अरविंद हस्तेकर तसेच पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. अरुण हुपरीकर यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात पुणे शाखेच्या सचिव केतकी कुलकर्णी यांनी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे कार्यालय सुरू करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त केले. संस्थेविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या, सामाजिक बांधिलकीतून संस्था कार्यरत असून भविष्यात विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, समाजातील प्रत्येक समाज घटकाने आपल्या ज्ञाती बांधवांच्या विकासासाठी प्रयत्न करणे यात काही चूक नाही. सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजघटक एकत्र येण्यास मदतच होते. शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय असे उपक्रम राबविण्यावर देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाने भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.