राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार – महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई ( अर्जुन मेदनकर ) : परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिले सर्वेक्षण पूर्ण केले असून जिल्ह्यातील एकल महिलांचे प्रमाण पाहून राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.
राज्यमंत्री बोर्डीकर यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घालून, परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिले सर्वेक्षण पूर्ण केले आहे. नगरपंचायत, नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम
राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास, बचत गटांचे सशक्तीकरण, गृहउद्योग प्रोत्साहन, आरोग्य व निवारा सुविधा यांसारखे कार्यक्रम राबवले जातील. यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सीआरएस भागीदार यांच्यामार्फत एकात्मिक धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
तालुका व जिल्हा स्तरावर कृतीगट स्थापन करण्यात येणार ६० वर्षांवरील महिलांसाठी वृद्धापकाळातील योजनांचा अभाव लक्षात घेता त्यांना आरोग्य, सुरक्षितता व उदरनिर्वाहासाठी नवे उपक्रम राबवले जाणार आहेत. उमेद व माविम यांच्या मदतीने स्वयंरोजगार व कौशल्यविकासाचे प्रयत्न वेगाने सुरू करण्यात येणार असून तालुका व जिल्हा स्तरावर कृतीगट स्थापन केले जातील.
राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, एकल महिला हा राज्यातील दुर्लक्षित प्रश्न आहे. या सर्वेक्षणातून त्यांची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दुरवस्था समोर आली आहे. आगामी कृती आराखड्यामुळे या महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण होईल आणि महिला सन्मान व सामाजिक समावेश साध्य करता येईल.
परभणी जिल्ह्यातील ग्रामस्तरावरील सर्वेक्षणात निरक्षर व शेतमजूर महिला असून
जमिनीचा मालकी हक्क, राहते घर व उत्पन्नाचे साधन यांचा अभाव यामुळे या महिलांना आरोग्य, निवारा, उपजीविका आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधांची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३४ हजार ७३३ एकल महिला असल्याचे अंगणवाडी सेविकांच्या मदतीने झालेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आली आहे आहे. या महिलांपैकी विधवा आणि ज्येष्ठ नागरिक आहेत.