ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

रामेश्वर रुई येथील एकमेवाद्वितीय मानवतातीर्थ भवनाचे महाद्वार व पवनपूत्र श्री हनुमान मूर्तीची स्थापना

विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून साकार

Spread the love

पुणे, ९ सप्टेंबरः रामेश्वर रुई या गावाचे नुकतेच ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ’ असे नामकरण झाले. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे ‘विश्वधमी मानवतातीर्थ भवन’ या वास्तूची निर्मिती होय. विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे भारत तर्फे या भवनाचा लोकार्पण सोहळा ५, ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रुई येथे होणार आहे. यावेळी देशभरातील विविध धर्मांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
त्याची पूर्व तयारी या ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन’ च्या ऐतिहासिक स्वरूपाचे संपूर्ण नक्षीदार लाकडी बांधकाम उभारण्याचा कार्यक्रम तसेच सदरील भवनाच्या आवारात पवनपुत्र श्री हनुमान यांचा भव्य व देखणा ११ फूट उंचीचा पुतळा स्थापन करण्याचे काम नुकतेच संपन्न झाले.


यावेळी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, रामेश्वर-रुईचे माजी सरपंच तुळशीराम दा कराड, काशीनाथ दा कराड, राजेश कराड आणि पंचक्रोशितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरील ‘ विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनात’ विविध धर्माचे संस्थापक, जगाच्या इतिहासातील मान्यवर संत, सज्जन, वैज्ञानिक, विचारवंत, दार्शनिक यांचे सचित्र दर्शन माहितीद्वारे भवन सजविण्यात येऊन जगाला शांती व मानवतेचा संदेश देण्याचे कार्य करण्यात येणार आहे.
यावेळी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” महाराष्ट्रातील मराठवाड्यातील रामेश्वर रुई हे गांव यज्ञभूमी म्हणून परिचित आहे. याच गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन जवळपास २७५ वर्षापूर्वी उध्वस्त केलेले श्रीराम मंदिर व सुमारे ६३ वर्षापूर्वी उध्वस्त करण्यात आलेली जामा मस्जिद व ख्याजा जैनुद्दिन चिश्ती दर्गा यांची पुनर्बांधणी केली. भारताच्या इतिहासातील सांप्रदायिक सद्भावनेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन यांची उभारणी केली आहे. अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध उपक्रमांमुळे हे गाव खर्‍या अर्थाने मानवतातीर्थ म्हणून जागतिक स्तरावर उदयास आले आहे.”
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५६वीं तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान व साधी राहणी व उच्च विचार सरणी याचे मुर्तीमंत प्रतिक असलेले भारतरत्न श्री लाल बहाद्दुर शास्त्री यांची १०१वीं जयंती याचे औचित्य साधून सदरील विश्वशांती मानवता तीर्थ भवनाचे लोकार्पण योजण्यात आले आहे.
पंचक्रोशितील नागरिकांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांसाठी राष्ट्रीय ऐक्याचे प्रतिक असणार्‍या या भवनाचा सद्उपयोग करावा, असे आवाहन डॉ. कराड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!