– ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या साक्षीने ढोल-ताशा पथकांनी रचला इतिहास
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना गगनभेदी मानवंदना

आसमंती भिनला, दाही दिशा घुमला… ‘शंभुराजे शंभुराजे’ जयघोष!
पिंपरी-चिंचवड : आसमंत उजळून टाकणारे भगवा ध्वज… ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद…आणि मर्दानी खेळ सादरकरणाऱ्या मावळ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके… आणि त्याला शिवगीत सादरकर्ते अवधुत गांधी यांच्या मावळी सुरांची साथ… शिव-शंभूभक्तांची अफाट गर्दी… आणि साक्षात वरुणराजाचा जलाभिषेक… असा ना भूतो ना भविष्यती अनुभव हजारो शिव-शंभूप्रेमी आणि पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला. निमित्त होते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प आणि शंभू सृष्टीला ढोल-ताशांची रोमहर्षक ऐतिहासिक मानवंदनेचे.
हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ऐतिहासिक मानवंदना सोहळ्याचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे करण्यात आले होते. या निमित्ताने हजारो शिव-शंभू भक्तांनी या ठिकाणी तुफान गर्दी केली. विशेष म्हणजे, पावसाने जोरदार हजेरी लावलेली असतानाही हा सोहळा अक्षरश: ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरला.
शिव गीतांचे प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मानवंदना सादर केली. यानंतर हिंदू भूषण ट्रस्ट स्मारकाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ‘‘युगत मांडली…’’, ‘‘शिवरायांच्या बुद्धीयुक्तीचा लागना पारं..’’ , ‘‘शिवबा राजं… शिवबा राजं…’’ अशा गीतांवर हजारो प्रेक्षक आणि वादकांनी ताल धरला.
ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत शिवशंभूच्या विचारांना पुढे चालवण्यासाठी ‘‘धर्मनिष्ठा, कर्मनिष्ठा’’ हेच ब्रीद ठेवून काम करणारे आमदार महेश लांडगे आहे असे सांगत “आय लव्ह यु दादा” असे म्हटले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम शिवशंभु प्रेमी, पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिववंदना आणि ध्वज प्रणामाने सोहळ्याचा समारोप करण्यात आला. यावेळी ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ च्या आवारात जोरदार आतिषबाजी करण्यात आली.
******
शंभू राजांना अभिप्रेतकाम ट्रस्ट करेल…
यावेळी स्मारकाचा उद्देश आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आला. प्रा. इंद्रजीत भोसले यांनी स्मारकाची उद्दिष्टे यावेळी जाहीर केली ते म्हणाले की, हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट पिंपरी-चिंचवडची स्थापना सन 1860 संस्था नोंदणी अधिनियमाच्या कलम 20 अन्वये करण्यात आलेली आहे. स्मारकाचा उद्देश तरुण पिढीमध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे विचार भावी पिढ्यापर्यंत आणि जगभरात प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे विचार स्वातंत्र, पराक्रम धर्मनिष्ठा, ज्ञाननिष्ठा आणि स्वराज्य रक्षणासाठी समर्पित होते त्यांनी आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या विचारांना समर्पित असे काम ट्रस्ट येणाऱ्या कालावधीत करेल.
******
दाही दिशा शिव-शंभूंसमोर नतमस्तक…
हजारो शिवशंभु प्रेमी, ढोल ताशा वादक यांच्या माध्यमातून गगनभेदी मानवंदना छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी वरुण राजाने देखील हजेरी लावली. ढोल ताशांच्या गजरातील मानवंदनेने आसमंती एकच गगनभेदी गजर झाला. दाही दिशा ‘शिवशंभू’च्या नावापुढे नतमस्तक झाल्या. 3 हजारपेक्षा अधिक ढोल, 1 हजारपेक्षा अधिक ताशा, तसेच 500 ध्वजांच्या गजरात मानवंदना देण्यात आली.
*****
अचूक नियोजन अन् महाराष्ट्रभरातून पथके…
महाराष्ट्रातील शंभरहून अधिक नामांकित ढोल-ताशा पथके यात सहभागी झाली होती. कार्यक्रमासाठी पार्किंग, भोजन, पिण्याचे पाणी, तसेच वैद्यकीय सेवा अशा आवश्यक सर्व सुविधा सज्ज होत्या. नियोजित आणि चोख नियोजनामध्ये हा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत पार पडला.या मानवंदनासाठी महाराष्ट्रातून अनेक नावाजलेले ढोल ताशा पथक सहभागी झाले. दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड लगतच्या अनेक भागातून शिवशंभु प्रेमींनी या मानवंदनेचा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
*****
‘‘लंडन बूक ऑफ रेकॉर्ड’’ मध्ये नोंद…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हे स्मारक जगातील सर्वात उंच म्हणून नोंद झाली आहे. याशिवाय आज देण्यात आलेली मानवंदना यासाठी ढोल ताशा पथकांची उपस्थिती हे देखील नोंद पहिल्यांदाच झाली असून, याबद्दल ‘‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड’’ द्वारा हिंदू भूषण ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
******
संतपीठ, मर्दानी खेळांनी लक्ष वेधले…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पासमोरील समोरील मानवंदना कार्यक्रमांमध्ये मर्दानी खेळ लक्ष वेधून घेत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे चिखली येथील संतपिठाच्या माध्यमातून कीर्तन सादर करण्यात आले. बाल शिवभक्ताची शिवगर्जनाही लक्षवेधी ठरली.
*****
‘त्या’ नराधमांचा चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाही..!
महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता आमच्या माता-भगिनींवर अन्याय होतो. अशावेळी धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांना स्मरून सांगतो. ट्रस्टच्या माध्यमातून मी आणि माझे सहकारी या अन्यायाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतील. वालचंद नगर येथे एका गतिमंद मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार घडला. असा प्रकार आपल्या घरातील व्यक्तीसोबत घडला असता, तर आपण गप्प बसलो असतो का? यापुढील काळात माता-भगिनींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला, तर पोलिसांपर्यंत जायची ही गरज लागणार नाही महेश लांडगे आणि त्यांचे सहकारी अशा नराधमांचा चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाही, असे आक्रमक भाषण हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केले.