पुण्यात गेल्या एक वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत पळत असलेला मोका मधील पाहिजे आरोपी अखेर खडकी गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात अडकला.

मा. पोलीस आयुक्तांच्या स्पष्ट सूचनांनुसार क्राईम युनिटलाही पाहिजे आरोपींच्या शोधासाठी विशेष टास्क देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे (झोन ४) यांनी स्वतः क्राईम मिटिंग घेऊन कारवाई गतीमान करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मा. वपोनि विक्रमसिंह कदम यांनी पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या नियंत्रणाखाली खडकी गुन्हे शोध पथकाची आखणी केली.
बातमीदारांना सतर्क करण्यात आले. अखेरीस खडकी पोलीस ठाण्याचे अमलदार रुशीकेश दिघे यांना गुप्त माहिती मिळाली — एक वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा मोका आरोपी शुभम बाळकृष्ण उमाळे (वय २६, रा. राजीव गांधीनगर, खडकी) परिसरात येणार आहे!
क्षणाचाही विलंब न करता वरिष्ठांना कळविण्यात आले. त्यानंतर खडकी एमएसईबी चौक ते त्रिकोणी गार्डन दरम्यान सापळा रचण्यात आला. पोलिस पथकाचे श्वास रोखलेले… नजर ताणलेली… आणि वेळ जणू थांबलेली. अचानक बातमीदाराने दाखवलेल्या वर्णनासारखाच इसम पुढे आला! पथकाने क्षणार्धात छापा टाकला. पोलीस अमलदार शशी सपकाळ, प्रताप उर्फ आबा केदारी, शंशाक डोंगरे, गालीब मुल्ला, अनिकेत भोसले, सुधाकर राठोड, दिनेश भोये आणि पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या अचूक नियोजनामुळे आरोपी जेरबंद झाला.
चौकशीत — तो इसम गुन्हा क्रमांक २५२/२०२५ मधील *मोका कायद्यांतर्गत पाहिजे आरोपी शुभम उमाळे*च होता. त्याच्यावर भारतीय न्यायसंहितेतील गंभीर कलमे, आर्म्स अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट आणि मोका कलम ३ (१)(ii), ३(२), ३(४) असे गुन्हे दाखल आहेत.
आरोपीला मा. सपोनि विठ्ठल दबडे यांच्या समक्ष हजर करून अटक करण्यात आली.
या संपूर्ण मोहिमेतून स्पष्ट झाले आहे की, मा. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या क्राईम युनिटच्या टास्कमध्ये खडकी गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज यश संपादन केले आहे. गुन्हेगार कितीही शिताफीने पळाला तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटका नाही — हे पुन्हा सिद्ध झाले आहे.