स्वारगेट मेट्रो स्थानक भविष्यात पुणेकरांना प्रवासासोबतच कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब ठरेल! _ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विश्वास
ना. पाटील यांच्याकडून स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहाणी आणि आढावा

पुणे. आगामी काळात स्वारगेट मेट्रो स्थानक हे सर्वसामान्य पुणेकरांना प्रवाशांना प्रवासासोबतच; कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब देखील ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. ना. पाटील यांनी स्वारगेट मेट्रो स्थानकास भेट देऊन; स्थानकाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, संचलन व प्रणालीचे संचालक विनोदकुमार अग्रवाल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले की, स्वारगेट बस स्थानक हे पुण्याीतल सर्वात व्यस्त बस स्थानक आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नागरिक पुण्यात येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकाचाच वापर करतात. यापूर्वी स्वारगेटला आलेला प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पीएमपीएमएल किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, पुण्याच्या उदरात तयार झालेले मेट्रो स्टेशनला आताच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ते पुढे म्हणाले की, स्वारगेट मेट्रो स्थानकाचा आराखडा अतिशय भव्य स्वरूपाचा आहे. हे स्टेशन एका मोठ्या मल्टीमोडल हबमध्ये विकसित केले जात आहे, ज्यामुळे विविध वाहतूक सेवांचे एकत्रीकरण होणार आहे. त्यामुळे आगामी काळात कॅार्पोरेटसाठी देखील प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.