मराठी

शिवदर्शनमधील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात ७० फूट उंचीचे आकर्षक गोपुरशिवदर्शनमधील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात ७० फूट उंचीचे आकर्षक गोपुर

मदुराईच्या प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराचे वैभव प्रथमच पुण्यात!

Spread the love

यंदाच्या नवरात्राचे खास आकर्षण: एक एकर जागेवर साकारतेय हुबेहूब प्रतिकृती

 

पुणे . दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील मदुराई येथे १६व्या शतकात उभारलेले ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले मीनाक्षी मंदिर यंदा पुणेकरांना पुण्यातच अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पुण्यातील शिवदर्शन, सहकारनगर येथील प्रसिद्ध जागृत श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात सुमारे एक एकर जागेवर मदुराईच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती पुणे नवरात्रौ महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापौर श्री. आबा बागुल आणि श्री लक्ष्मीमाता मंदिर समितीचे उत्सवप्रमुख श्री. हेमंत बागुल यांनी दिली.

ते म्हणाले कि, या देखाव्यात ७० फूट उंचीचे भव्य गोपुर, तसेच मीनाक्षी मंदिरातील पौराणिक कथा, देवता, संत आणि विद्वान यांच्या शिल्पांची नक्षी, विविध मंडपांतील खांबावरील सुसंस्कृत शिल्पकाम, रंगीबेरंगी चित्रकला आणि वास्तुशैलीचे विविध पैलू पुणेकरांना पाहावयास मिळणार आहेत. संपूर्ण देखावा मुंबईतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री. अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असून, त्यात मीनाक्षी मातेसह मंदिरातील कलात्मक घटकांचे तपशीलवार सादरीकरण आहे.

यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात हा देखावा विशेष आकर्षण ठरणार आहे. सुबक व मनमोहक अशा या स्थापत्यशैलीतून पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव मिळणार आहे.पुणे नवरात्रौ महोत्सव समिती गेली ३१ वर्षे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आयोजित करत आहे. दरवर्षी मंदिर परिसर आकर्षक सजावटीने नटलेला असतो; परंतु यंदाचा देखावा भव्यतेने आणि कलात्मकतेने विशेष ठरणार असल्याचा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला. नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तांसाठी हे मंदिर दर्शन आणि स्थापत्यकलेचा अनुपम अनुभव ठरणार असून पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हेमंत बागुल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!