मराठी

म्हाडाच्यावतीने नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यात येतील – पुणे म्हाडाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील

Spread the love

पुणे, : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना २.० शहरी राबविण्यात येत असून याकरिता केंद्र वा राज्य शासनाकडून अनुदान उपलबध करुन देण्यात येत आहे. म्हाडाच्यावतीनेही पुणे जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेअंतर्गत मुळशी तालुक्यातील नेरे आणि खेड तालुक्यातील रोहकल येथे घरे उपलब्ध करून देण्यात येतील- असे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे (म्हाडा) सभापती शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) प्रलंबित विषयाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, म्हाडाचे मुख्याधिकारी राहूल साकोरे, तहसीलदार शिरूर बाळासाहेब म्हस्के, शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यापुढे श्री. डुडी म्हणाले, म्हाडाने रोहकल व नेरे येथे प्रस्तावित प्रधानमंत्री आवास योजनेतील नागरिकांना रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधांसह इतर सामाजिक सुविधा उपलब्ध होतील अशा रितीने प्रकल्प आराखडा तयार करावा, गृहनिर्माण प्रकल्पाबाबत जागेचे सर्वेक्षण करावे, जिल्हा प्रशासनाच्यावतीने अशा सुविधांसाठी जागा व निधीची उपलब्धता करुन देण्यात येईल.

स. क्र. ५३२ शिरूर ग्रामीण येथील पुणे म्हाडाच्या २ हेक्टर जागेचा वापर ग्रामपंचायत शिरूर ग्रामीण व रामलिंग देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून यात्रेदरम्यान वाहनतळ तसेच बैलगाडा शर्यतीसाठी केला जात असल्याने अद्यापपर्यंत गृहनिर्माण योजना राबविता आली नाही. याबाबत या जागेवर म्हाडामार्फत गृहनिर्माण योजना राबविल्यास गरजूंना घरे उपलब्ध होतील असे सांगून म्हाडास योजना राबविण्यास मार्ग मोकळा करून द्यावा अशा सूचना रामलिंग देवस्थान ट्रस्ट व सरपंच शिरूर ग्रामीण यांना श्री. डूडी यांनी दिल्या.

स. क्र. ११४३ शिरूर येथील म्हाडाच्या जागेशेजारील कचरा डेपो इतरत्र हलविल्यास या जागेवर म्हाडास गृहनिर्माण योजना राबविणे भविष्यातील सदनिका धारकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे होईल असे श्री. आढळराव पाटील यांनी विशद केले. याबाबत शिरुर नगरपरिषदेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यास गोलेगाव ग्रामंपचायतीने तयारी दर्शवली, सबब चाकण व राजगुरुनगरच्या धर्तीवर गोलेगाव येथील पर्यायी जागेवर संयुक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबतचा प्रस्ताव नगरपरिषदेने सादर करावा, अशा सूचना श्री. डुडी यांनी दिल्या.

शिरुर तालुक्यातील पाबळ येथे म्हाडामार्फत गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने मागणी केल्याचे सभापती श्री आढळराव पाटील यांनी सांगितले. याबाबत सदर जागा गृहनिर्माणासाठी उपयुक्त असल्यास शासनामार्फत म्हाडास जमीन उपलब्ध करून देता येईल, असे श्री. डुडी म्हणाले.

श्री. थोपटे यांनी म्हाडाने स्वस्तात व मागणी असलेल्या ठिकाणी नागरिकांना घरे उपलब्ध करून द्यावीत, तसेच त्यांना हक्काच्या घरांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना केली.

श्री. साकोरे यांनी म्हाडाच्यावतीने नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगून आगामी काळात अधिकाधिक नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!