मराठी

वय हा केवळ एक आकडा

ज्येष्ठ नागरिकांच्या आनंद मेळाव्यात खासदार सुळे यांचे मत

Spread the love

 

पुणे : वय हा केवळ एक आकडा असून आपण आपले कर्तृत्व कधीही दाखवू शकतो. वयामध्ये अडकू नका, जेष्ठ या शब्दाऐवजी दुसरे नाव देता येईल का? याचा विचार झाला पाहिजे. निवृत्ती ही प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी असू शकते, कारण त्यांचा अनुभव येणाऱ्या नव्या पिढीसाठी महत्वाचा आहे, असे सांगतानाच आताचे जेष्ठ नागरिक स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचाराचे आहेत, ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले.

चव्हाण सेंटरच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्यात राज्यातील काही ज्येष्ठ नागरिकांना “यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान” देऊन गौरविण्यात आले. खासदार सुळे आणि वस्तू व सेवा कर विभागाचे विशेष आयुक्त नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या या सोहळ्यात कोल्हापूर येथील सुशीला ओडेयर, सांगली येथील चेलनादेवी खुरपे, पुणे येथील अरुण रोडे, छत्रपती संभाजी नगर येथील रमेश दुसे, चंद्रपूर येथील श्रीराम पान्हेरकर, मुंबई येथील सलमा खान यांना ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात आला. तसेच, यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान लातूर येथील ज्येष्ठ नागरिक संघास प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” वय हा केवळ आकडा असून आपण आपले कर्तृत्व कधीही दाखवू शकतो. पवार साहेबांनी ६० व्या वर्षी पक्ष स्थापन केला. आताचे जेष्ठ नागरिक स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचाराचे आहेत, ही खूपच कौतुकास्पद बाबा आहे. त्यामुळे वयामध्ये अडकू नका, जेष्ठ या शब्दाच्या ऐवजी त्याला दुसरे नाव देता येईल का? याचा विचार झाला पाहिजे. निवृत्ती ही प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी असू शकते, कारण त्यांचा अनुभव येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्वाचा आहे. अगोदरची पिढी अंधश्रद्धेच्या विरोधात होती, पण आम्ही आता परत उलटा प्रवास सुरु केला आहे. हे दुर्दैवी आहे. आपली संस्कृती, साहित्य आधीच्या पिढीने जपले आहे म्हणून हा कौतुक सोहळा होत आहे. तथापि कौतुक झाले म्हणून काम न संपवता ज्येष्ठांनी मार्गदर्शन करणे थांबवू नये. आपल्याला महाराष्ट्र पुन्हा योग्य मार्गावर आणायचा आहे.”

विशेष आयुक्त नितीन पाटील म्हणाले, “तळागाळात जाऊन लोकांशी संपर्क साधून त्यांची भूमिका सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम चव्हाण सेंटर करत आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपण आरोग्य विषयक जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेऊयात. त्यासाठी आपण पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांनी सकारात्मक बदल घडविण्यासाठी एकत्र यायला हवे. ज्येष्ठ नागरिकांची वोटिंग पॉवर खूप आहे, त्याचा योग्य रीतीने वापर करा.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रमोद ढोकले यांनी केले. दत्ता बाळसराफ यांनी प्रास्ताविक केले, तर दीपिका शेरखाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!