एमसीए महिला १५ वर्षाखालील एक-दिवसीय निमंत्रित स्पर्धा २०२५ !!
पुण्याच्या एसएआरके ॲकॅडमी संघाचा सातारा जिल्हा संघावर दणदणीत विजय !!
पुणे, ७ ऑक्टोबरः महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) तर्फे आयोजित ‘एमसीए महिला १५ वर्षाखालील एक-दिवसीय निमंत्रित २०२५’ स्पर्धेत आर्या मगर हिने फटकावलेल्या ९५ धावांच्या जोरावर पुण्याच्या एसएआरके ॲकॅडमी संघाने सातारा जिल्हा संघाचा १४० धावांनी पराभव करून शानदार विजयी सलामी दिली.
सोलापुर येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियममध्ये ब गटाच्या आज झालेल्या सामन्यामध्ये शिवलिंग अन्शीरे आणि रफिक किरगोडी (एसए-आरके) ॲकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एसएआरके संघाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच षटकामध्ये त्यांची सलामीची फलंदाज बाद झाली. माही सुंकाळे (१४ धावा) आणि आर्या व्यास (१२ धावा) यांनी छोटी खेळी केल्या. बाराव्या षटकामध्ये ६१ धावांवर ४ गडी बाद असा संघ अडचणीमध्ये सापडला होता. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या आर्या मगर हिने ७४ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकारासह ९५ धावांची खेळी केली. तिला रूची घनवट (२२ धावा) हिने दुसऱ्या बाजुने योग्य साथ दिली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी ११७ चेंडूत १३८ धावांची भागिदारी रचली आणि संघाचा डाव बांधला. एसएआरके संघाने ३५ षटकात ६ गडी गमावून २२६ धावांचे लक्ष्य उभे केले. सातारा संघाच्या आर्या फडतरे (२-३५) आणि वेदीका सुतार (२-३३) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या धावसंख्येला उत्तर देताना सातारा जिल्हा संघाचा डाव ३५ षटकामध्ये ८६ धावांवर मर्यादित राहीला. सातारा संघाकडून अनवी दर्शालय हिने नाबाद ३१ धावांची खेळी करून एकाकी झुंझ दिली. एसएआरके संघाच्या माही सुंकाळे हिने ७ धावांत २ गडी, अस्मि मोकाशी हिने ४ धावांत २ गडी आणि कर्णधार जान्हवी गायकवाड हिने १८ धावांत २ गडी टिपत चमकदार गोलंदाजी केली आणि संघाचा विजय निश्चित केला.
*ब गटामध्ये पुण्याच्या एसएआरके ॲकॅडमी, सातारा जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि यजमान सोलापुर जिल्हा या पाच संघांचा समावेश आहे. ब गटाचे सर्व सामने सोलापुर जिल्ह्यात होणार आहेत.*
सामन्याचा संक्षिप्त निकालः गट बः
एसएआरके ॲकॅडमीः ३५ षटकात ६ गडी बाद २२६ धावा (आर्या मगर ९५ (७४, १४ चौकार, १ षटकार), रूची घनवट २२, माही सुंकाळे १४, आर्या व्यास १२, आर्या फडतरे २-३५, वेदीका सुतार २-३३);(भागिदारीः पाचव्या गड्यासाठी आर्या आणि रूची यांच्यात १३८ (११७) वि.वि. सातारा जिल्हा संघः ३५ षटकात ८ गडी बाद ८६ धावा (अनवी दर्शालय नाबाद ३१, माही सुंकाळे २-७, अस्मि मोकाशी २-४, जान्हवी गायकवाड २-१८); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः आर्या मगर.



