ब्रेकिंग न्यूज़मनोरंजनमराठीमहाराष्ट्र

बासरीप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे विद्यार्थ्यांचा बुद्धी विकास शक्य: पंडित रोणू मजुमदार

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात रंगमंचीय कला महत्वपूर्ण - प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

Spread the love
पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाने उपस्थित मंत्रमुग्ध
पुणे. “गुरु केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही, तर आयुष्याला दिशा देण्याचे काम करत असतो. आपल्यातील सर्वोत्तम गुण हेरून विद्यार्थ्यांना घडवण्याचे सामर्थ्य गुरुकडे असते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान अलौकिक आहे. आपण समर्पित भावनेने काम करत राहावे, तसेच विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक गॅजेटस् पासून दूर राहून छंद जोपासावेत. बासरीप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे विद्यार्थ्यांचा बुद्धी विकास सहज शक्य होऊन सर्वांगीण विकास साधला जाऊ शकेल,” असे मत ज्येष्ठ बासरीवादक पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांनी व्यक्त केले. भारतीय संगीत ही अध्यात्माची वाट आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुजुमदार बोलत होते. संगीत आणि गुरुकुल परंपरा यांचा संगम म्हणजे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 
यावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे पंडित रोणू मजुमदार यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. शिक्षण, कला, समाजसेवा आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. गायिका आनंदी रोणू मजुमदार, शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट सुजाता कोडग यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय स्त्रीशक्ती पुरस्कार‘ देण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया व सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रंगमंचीय कला महत्वाच्या भूमिका निभावतात. नाटक, नृत्य, गायन आणि अभिनय यांसारख्या कलांमुळे केवळ सर्जनशीलता वाढत नाही, तर नेतृत्वगुण, संवाद कौशल्य आणि निर्णयक्षमता सुधारते. रंगमंच हा शिक्षणाचा एक अविभाज्य भाग असायला हवा. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर कलाक्षेत्रातही प्रगती करावी, याकरिता सूर्यदत्तमध्ये कला, तसेच सर्वच क्षेत्रातील दिग्गजांना, युवा कलाकारांना निमंत्रित केले जाते. त्यांच्याशी संवादाचे आयोजन केले जाते. मोबाइल, टीव्हीपासून अंतर ठेवत उच्च शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी छंद जोपासावेत आणि परिपूर्ण विकास घडवावा, यासाठी सूर्यदत्त सदैव प्रयोगशील राहील.”
 
पंडित मजुमदार यांनी बासरीवादन करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सानिया पाटणकर यांनी आपल्या बहारदार आवाजात ‘हे सुरानो चंद्र व्हा‘ नाट्यपद आणि संस्कृत गणेश वंदना सादर केली. रोणू व आनंदी या मुजुमदार दाम्पत्याने भक्तीरचना सादर केली. सानिया पाटणकर, आर्कि. सुजाता कोडग यांनीही व्यवसायातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. नरेंद्र कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
——————–
२७८७: पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार’ प्रदान करताना डावीकडून अक्षित कुशल, नरेंद्र कुलकर्णी, प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, पंडित रोणू मजुमदार, वंदना पांड्ये, आनंदी रोणू मजुमदार, सानिया पाटणकर, आर्कि. सुजाता कोडग.
२७९८: आनंदी रोणू मजुमदार यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय स्त्रीशक्ती पुरस्कार’ प्रदान करताना डावीकडून अक्षित कुशल, नरेंद्र कुलकर्णी, प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, पद्मश्री पंडित रोणू मजुमदार, वंदना पांड्ये, आनंदी रोणू मजुमदार, सानिया पाटणकर, आर्कि. सुजाता कोडग.
२८१३: आर्कि. सुजाता कोडग यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय स्त्रीशक्ती पुरस्कार’ प्रदान करताना डावीकडून अक्षित कुशल, प्रतीक्षा वाबळे, प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, विद्या गवेकर, आर्कि. सुजाता कोडग, मनीषा कुंभार, सानिया पाटणकर, पद्मश्री पंडित रोणू मजुमदार, आनंदी रोणू मजुमदार, वंदना पांड्ये.
२८०८: सानिया पाटणकर यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय स्त्रीशक्ती पुरस्कार’ प्रदान करताना डावीकडून विद्या गवेकर, अक्षित कुशल, नरेंद्र कुलकर्णी, प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सानिया पाटणकर, मनीषा कुंभार, प्रतीक्षा वाबळे, पद्मश्री पंडित रोणू मजुमदार, आनंदी रोणू मजुमदार, आर्कि. सुजाता कोडग, वंदना पांड्ये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!