विद्यार्थी साहाय्यक समितीच्या मुलींच्या वसतिगृहाचे सोमवारी उद्घाटन
अमेरिकास्थित देणगीदार गायतोंडे दाम्पत्याची उपस्थिती; कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे: विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने ३३६ मुलींसाठी उभारलेल्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन येत्या सोमवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजता लजपत विद्यार्थी संकुल, विद्यार्थी साहाय्यक समिती, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे. अमेरिकास्थित देणगीदार विभावरी आणि गिरीश गायतोंडे या दाम्पत्याच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी ज्येष्ठ उद्योजक व समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी विश्वस्त मंडळातील तुकाराम गायकवाड, संजय अमृते, रत्नाकर मते, प्रभाकर पाटील, चंद्रकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
तुषार रंजनकर म्हणाले, “ग्रामीण भागातील गरजू मुलामुलींकरिता अल्पदरात निवास-भोजन व व्यक्तिमत्व विकास साधणाऱ्या विद्यार्थी साहाय्यक समितीची आजमितीला आठ वसतिगृहे झाली असून, पुण्यात विद्यार्थ्यांची संख्या १४०० वर गेली आहे. ३३६ मुलींकरिता अत्याधुनिक सोयींनी युक्त असे हे वसतिगृह संस्थेच्या वाटचालीतील महत्वाचा टप्पा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात उच्च शिक्षण घेताना अल्पदरात निवास, भोजन देताना, त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम गेल्या ७० वर्षांपासून सुरु आहे. अहिल्यानगर येथे मुलांचे एक व मुलींचे एक वसतिगृह यावर्षीपासून सुरू झाले आहे. तसेच महिला सेवा मंडळाच्या सहकार्याने कर्वेनगर येथेही मुलींचे वस्तीगृह सुरू करण्यात आले आहे.”
तुकाराम गायकवाड म्हणाले, “समितीमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन झाले आहे. समितीची वसतिगृहे खऱ्या अर्थाने युवा परिवर्तनाची केंद्रे आहेत. कोणतीही शासकीय मदत न घेता केवळ समाजाच्या आर्थिक मदतीवर इतकी वर्षे हे काम सुरू आहे. निस्पृह भावनेने वेळ देणारे कार्यकर्ते, व्यवस्थापनातील विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे हे शक्य होते. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा ही संस्थेची त्रिसूत्री आहे. समितीमध्ये विद्यार्थ्यांना कमवा व शिका, चारतास काम करावे लागते. येथील सर्व कामे विद्यार्थी-विद्यार्थिनीच करतात.”
गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी, शेतमजूर पालकांना आपल्या मुली शिकाव्यात असे वाटू लागल्याने त्यांचा पुण्याकडे येण्याचा कल वाढला आहे. परवडणारा खर्च आणि सुरक्षितता यामुळे समितीत प्रवेश मिळावा अशी सर्वाची इच्छा असते. त्यामुळे पुण्यात मुलींसाठी अजून एक वसतिगृह बांधण्याचा संकल्प संस्थेने केला आणि दोन वर्षात ही इमारत पूर्ण झाली. त्यामुळे ३३६ विद्यार्थिनींची व्यवस्था वाढली आहे, असे संजय अमृते यांनी सांगितले.
प्रभाकर पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समितीमध्ये विद्यार्थी विकास केंद्रांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. रत्नाकर मते समितीच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली. तसेच समितीमार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांविषयी सांगितले.



