मराठा समाजाने गिरीराज सावंत यांच्या पाठीशी उभे राहावे: * गंगाधर काळकुटे यांचे आवाहन; सकल मराठा समाज, धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा
संघर्षात साथ दिलेल्या नेतृत्वाला बळ; गिरीराज सावंत यांना मराठा समाजाचा पाठिंबा

पुणे: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात पाठीशी उभे राहणार्या, आत्महत्या केलेल्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करणार्या आणि मराठा समाजासह सर्वच समाजातील गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचे पुत्र गिरीराज सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे नेते गंगाधर काळकुटे यांनी पुण्यात केले. ज्या हातांनी संकटकाळात समाजाला सावरले, त्या हातांना बळ देणे हे आपले कर्तव्य आहे. गिरीराज सावंत यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नसून तो समाजसेवेचा विजय असेल, असेही काळकुटे म्हणाले. प्रसंगी यशवंत सेनेचे विष्णू कुऱ्हाडे, छावा संघटनेचे अशोक रोमन आदी उपस्थित होते.
गंगाधर काळकुटे म्हणाले, “माजी आरोग्यमंत्री व ‘मराठा भूषण’ प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी महाराष्ट्रात समाजसेवेचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. तोच वारसा त्यांचे पुत्र गिरीराज सावंत पुढे नेत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या संवेदनशीलतेचा विचार करून, सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना या निवडणुकीत खंबीर पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. मराठा आरक्षण चळवळीत आणि समाजाच्या कठीण काळात सावंत कुटुंबीय खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहेत. आता समाजाची ही जबाबदारी आहे की, अशा संवेदनशील आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या पाठीशी आपण उभे राहावे. प्रभाग ३७ च्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या आवाजाला महापालिकेत स्थान मिळवून देण्यासाठी गिरीराज सावंत यांना निवडून आणणे काळाची गरज आहे.”
तानाजीराव सावंत यांनी आजवर केवळ राजकारण न करता खऱ्या अर्थाने समाजकारण केले आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या तरुणांच्या वारसांना प्रत्येकी ३ लाख ते ५ लाख रुपयांची मदत करून त्यांनी समाजाला आधार दिला. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर आजपर्यंत सुमारे ७०० कुटुंबांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. या मुलांच्या शिक्षणापासून, फी, शैक्षणिक साहित्य ते थेट नोकरी आणि लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी ते स्वतः उचलत आहेत. मराठा समाजासह ओबीसी आणि धनगर समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांनाही त्यांनी तितक्याच तत्परतेने मदत केली आहे. त्यांच्या कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी गिरीराज हेही ‘कार्यसिद्धी प्रतिष्ठान’च्या माध्यमातून काम करीत आहेत. वडिलांप्रमाणे गिरीराज हेही सामान्यांसाठी ३६५ दिवस उपलब्ध असणारे नेतृत्व आहे. महापालिकेच्या माध्यमातून लोकांची कामे मार्गी लावण्याची धमक त्यांच्यात असून, शहरातील गरजू विद्यार्थ्यांच्या समस्या असोत किंवा आरोग्यविषयक अडचणी सोडवण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.”



