ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

पुण्याच्या विनाशाकडे नेणाऱ्या मेट्रो आणि बोगदा प्रकल्पांना कडाडून विरोध; निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांचा प्रशासनाला इशारा.

Spread the love

पुणे शहराच्या नियोजनाच्या नावाखाली सुरू असलेले अवाढव्य मेट्रो प्रकल्प आणि खडकवासला ते फुरसुंगी दरम्यानचा प्रस्तावित बोगदा हे प्रकल्प सामान्य नागरिकांच्या हिताचे नसून शहराचा विनाश करणारे आहेत, असा गंभीर आरोप ग्रीन थम्सचे संस्थापक अध्यक्ष निवृत्त कर्नल सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी केला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मेट्रो, वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्नावर प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

यावेळी बोलताना निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी खालील प्रमुख मुद्दे मांडले:

१. मेट्रो प्रकल्प की कँक्रीटचे जंगल?
आज जगभरात एलआरटी (LRT) आणि चीनसारख्या देशांत जमिनीवरून धावणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना, पुण्यात मात्र अवाढव्य बांधकामे आणि प्लॅटफॉर्म उभारले जात आहेत. मेट्रोच्या दोन्ही बाजूंना ५० मीटरपर्यंत ४ एफएसआय (FSI) देऊन जिथे बंगले होते तिथे टॉवर्स उभे केले जात आहेत. यामुळे एका स्कूटरच्या जागी आता शेकडो वाहने येतील, ज्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक जटील होईल.

२. ३२ कि.मी.चा बोगदा हा ‘मूर्खपणा’:
खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत दीड-दोन टीएमसी पाणी वाचवण्यासाठी ३२ किलोमीटरचा बोगदा कशासाठी? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्याऐवजी धरणातील गाळ (माती) काढला तर साठवण क्षमता वाढेल आणि ती माती शेतकऱ्यांना दिल्यास त्यांचे उत्पन्न चौपट होईल. या बोगद्यातून निघणारा प्रचंड मलबा टाकायचा कुठे, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.

३. कालव्यालगतचे रस्ते खुले करा:
पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या जागांचा वापर दुचाकींसाठी (टू-व्हीलर) रस्ता म्हणून करावा. हे रस्ते मोकळे केल्यास वाहतुकीचा मोठा भार हलका होईल, मात्र प्रशासन या जागांकडे दुर्लक्ष करून तिथे कचरा साचू देत आहे, ही खेदाची बाब आहे.

४. पाण्यासाठी रडणारी जनता आणि एसीमधील अधिकारी:
पुण्याला आपण ‘विद्येचे माहेरघर’ म्हणतो, पण आज पुण्यात टँकरराज सुरू आहे. गरीब महिला पाण्यासाठी मैलोन्मैल भटकत आहेत आणि दुसरीकडे अधिकारी एसी ऑफिसमध्ये बसून लाखो रुपये पगार घेत आहेत. ७० टक्के जनतेला पाणी मिळत नाही, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे.

प्रशासनाला आवाहन:
“पत्रकार बंधूंनी या प्रश्नावर आयुक्तांना आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारावा. मेट्रोचे प्लॅटफॉर्म आणि हे चुकीचे प्रकल्प थांबवले पाहिजेत. पुढच्या पिढीसाठी आपण एक चांगले आणि राहण्यायोग्य शहर सोडले पाहिजे,” असे कळकळीचे आवाहन निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी शेवटी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!