सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी – अतुल गाडगीळ
५५ वा राष्ट्रीय सुरक्षितता दिवस उत्साहात साजरा

पुणे, दि. ४ मार्च – देशभरात पर्यावरण, सुरक्षितता, आणि आरोग्य याची जाणीव निर्माण करून देणारा आजचा राष्ट्रीय सुरक्षितता दिवस आहे. सुरक्षा ही सर्वांनी आजन्म पाळण्याची गरज आहे तर ही सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणीव ठेवून नागरिकांनी सदैव जागरूक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पुणे महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी आज येथे व्यक्त केले. नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या ५५ व्या राष्ट्रीय सुरक्षितता दिवस (४ मार्च) कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुरेश क्षीरसागर, उपाध्यक्ष माधव गांगल, सचिव अतुल सोरटे, समिती सदस्य सुहास कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना गाडगीळ पुढे म्हणाले की, पुणे मेट्रोचे देखील “सेफ्टी फर्स्ट” हेच ध्येय आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षितता असलेली आपली पुणे मेट्रो आहे. देशभरात आज दैनंदिन सुमारे एक कोटी लोक मेट्रोने प्रवास करतात. सर्वच मेट्रो या सुरक्षित धोरणाने बांधील आहेत. केवळ कायदा म्हणून नव्हे तर आपली वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी म्हणून सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यानुसार पुणे मेट्रो आणि देशातील सर्वच मेट्रो प्रकल्प नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतात. सर्वच प्रकारच्या कारखान्यांनी तसेच बांधकाम क्षेत्रातील लोकांनी अधिक सुरक्षित काम करण्यासाठी दक्ष राहिले पाहिजे. आज सुरक्षा प्रशिक्षणाची देखील नितांत गरज आहे. गती आणि पर्यावरण याचे संतुलन राखत काम करणे आवश्यक आहे.
१९८७ मध्ये पुण्यात नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशनची स्थापना झाली असून कारखाने आणि सर्व संस्थांमध्ये सुरक्षिततेची जागरूकता वाढवण्याबरोबरच पदविका अभ्यासक्रम देखील संस्थेतर्फे चालवला जातो, अशी माहिती यावेळी क्षीरसागर यांनी दिली.
सुरक्षितता पदविका परीक्षेतील प्रथम क्रमांक विजेते प्रवीण देवकर, द्वितीय क्रमांक विजेते संभाजी चांगभले यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी संस्थेचे समिती सदस्य कमलाकर वाघमारे यांनी सर्वांना सुरक्षितता शपथ दिली. सुहास कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर संस्थेचे सचिव अतुल सोरटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



