ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला ‘आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ प्रदान
प्रतिष्ठित आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनचा सन्मान

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिस्त, संघभावना व सातत्य महत्वाचे
सुनील गावस्कर यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त संस्थेला ‘आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ प्रदान
—————————— —————————— —
‘सूर्यदत्त’ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त संस्थेला ‘आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ प्रदान
पुणे, ता. २: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (एसआयएमएमसी) संस्थेला शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी ‘आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवॉर्डने (आरबीएनक्यूए) सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता, सातत्यपूर्ण सुधारणा आणि उत्कृष्ट व्यवस्थापन पद्धतींचा गौरव म्हणून ‘सूर्यदत्त’ला ‘कमेंडेशन सर्टिफिकेट’ प्रदान करण्यात आले. मुंबईतील चर्चगेट येथील आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीमध्ये या सोहळ्याचे नुकतेच आयोजन केले होते. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कैलास सत्यार्थी, जिंदल स्टेनलेस स्टील, हिसार आणि जीएमआर वरोरा इंजिनिअरिंग लिमिटेड यांचाही या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
भारताचे माजी क्रिकेटपटू, लिटलमास्टर सुनील गावस्कर यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा व विभागप्रमुख प्रा. डॉ. मनीषा कुंभार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘आयएमसी’च्या अध्यक्षा सुनीता रामनाथकर, आरबीएनक्यूए ट्रस्टचे अध्यक्ष निरज बजाज, या समारंभास डॉ. मेधा देशमुख, डॉ. विवेक स्वामी, डॉ. शीतल भुसारे आणि प्रा. स्मिता चव्हाण यांच्यासह सूर्यदत्ता संस्थेचे अनेक प्राध्यापक उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावरील या सन्मानामुळे सूर्यदत्त संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण क्षेत्रातील वाटचालीला नवे बळ मिळाले आहे.
सुनील गावस्कर म्हणाले, “शिस्त, संघभावना आणि सातत्य हे आपल्या जीवनात अतिशय महत्वाचे असते. क्रीडा आणि संस्थात्मक यशात साम्य असून, शिक्षण संस्थांनी गुणवत्ता साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच या गुणांची गोडी लावली, तर जीवनात यशाकडे वाटचाल करणे सोयीचे होते. शिक्षणासह खेळांमध्येही मुलांनी पारंगत व्हावे. खेळामुळे आपले मानसिक, शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते.”
कैलास सत्यार्थी यांनी आपल्या भाषणात गुणवत्ता ही केवळ प्रक्रियांपुरती मर्यादित नसून त्यात मूल्ये, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यांचाही समावेश असावा, असे सांगितले. तसेच, शिक्षणसंस्थांनी जागतिक पातळीवर जबाबदार नागरिक घडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. सूर्यदत्त समूहाच्या वतीने सुनील गावसकर आणि कैलाश सत्यार्थी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांना सूर्यदत्त कॅम्पसला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सूर्यदत्त शिक्षण संस्थेने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला आहे. जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘सूर्यदत्त’ संस्था सातत्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. हा सन्मान संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टता, नवोपक्रम आणि जागतिक दर्जाकडे होणाऱ्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला अलीकडेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. ‘एसआयएमसीसी’ला ‘एआयसीटीई–सीआयआय इंडस्ट्री-लिंक्ड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स सर्वेक्षणात सलग सहा वर्षे प्लॅटिनम कॅटेगरीमध्ये स्थान मिळाले आहे. ‘नॅक’कडून ‘ए’ श्रेणी प्राप्त असलेल्या या संस्थेने शैक्षणिक, संशोधन, उद्योग सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.



