
ब्रिटिश संसदेत ‘अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ भरत गीते यांना
‘हाऊस ऑफ कॉमन्स’, ‘ग्लोबल इन्स्पिरेशन ऑफ द इयर २०२६’ पुरस्कार
‘हाऊस ऑफ कॉमन्स’, ‘ग्लोबल इन्स्पिरेशन ऑफ द इयर २०२६’ पुरस्कार
लंडन, ता. २: मराठी उद्योजक व तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते यांना ब्रिटिश पार्लमेंटमधील प्रतिष्ठित ‘ग्लोबल इन्स्पिरेशन ऑफ द इयर २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच गीते यांना ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ या विशेष सन्मानानेही गौरविण्यात आले. ‘अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीते यांच्या कार्याचा जागतिक स्तरावर झालेला हा गौरव भारताच्या उद्योगविश्वासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.
लंडन येथील ब्रिटिश संसदेच्या पोर्टक्युलिस हाऊसमधील बुथरॉईड कक्षात हा सोहळा नुकताच पार पडला. दक्षिण आशियाई वाणिज्य व उद्योग मंडळाच्या वतीने गुजरात आणि महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योगपती अलोक किर्लोस्कर यांनाही याच पुरस्काराने गौरविण्यात आले. दोन्ही उद्योजकांच्या कार्यामुळे या सन्मानाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. या कार्यक्रमास ब्रिटनचे खासदार लुईस फ्रेंच, मराठी मंडळ लंडनचे सुशील गायकवाड, लॉर्ड रामिंडेर रेंजर, ओशियन अँड नॅचरल रिसोर्सेस संचालनालयाचे वरिष्ठ वाणिज्य संचालक सुरेश यादव, साऊथ एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे चेअरमन महेंद्रसिंह जडेजा आदी उपस्थित होते.
भरत गीते यांनी उद्योगातील नावीन्य, दूरदृष्टी आणि गुणवत्ता यांच्या जोरावर अॅल्युमिनियम क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत त्यांनी उद्योग उभारला असून, देशाच्या औद्योगिक प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या तौरल इंडिया कंपनीमार्फत चाकण आणि सुपा येथील उत्पादन केंद्रांतून अॅल्युमिनियम कास्टिंगचा पुरवठा देश-विदेशातील विविध औद्योगिक क्षेत्रांना केला जात आहे.
ब्रिटिश संसदेच्या ऐतिहासिक परिसरात मिळालेला हा सन्मान केवळ भरत गीते यांच्या कार्याचा गौरव नसून, भारतीय उद्योजकतेच्या जागतिक यशाचा ठसा मानला जात आहे. गीते यांचा हा सन्मान नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘स्थानिक ते जागतिक’ या प्रवासाचा तो एक उत्तम आदर्श ठरला आहे.
—————-



