धर्मब्रेकिंग न्यूज़मराठी

श्री महालक्ष्मी मंदिरात पुणेकरांनी रंगविल्या लाडक्या गणरायाच्या मूर्ती

'आपला बाप्पा आपणच रंगवा' हा अनोखा उपक्रम ; पर्यावरणपूरक मूर्तींना केले रंगकाम

Spread the love

पुणे : पारंपरिक पद्धतीने शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला रंग देणे, कोरड्या रंगांचा वापर करणे आणि मूर्तीवरील वस्त्रावर सिल्क इफेक्ट करणे अशा अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी आत्मसात करीत पुणेकरांनी आपला लाडका गणपती बाप्पा आपणच रंगवला. गणेशोत्सवात ज्या गणेशमूर्तीचे आपण पूजन करणार आहोत, त्या मूर्ती स्वतःच्या हाताने व कल्पकतेने रंगविण्याचा आनंद पुणेकरांनी घेतला.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग व तेजोमय कलामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपला बाप्पा आपणच रंगवा’ या कार्यशाळेचे आयोजन महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात करण्यात आले होते. मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल तसेच प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त हेमंत अर्नाळकर, व्यवस्थापक ऋषिकेश मोरे, तेजोमय कलामंदिरचे आनंद भांबुरकर, सोनाली नेने, प्रेरणा कुलकर्णी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

पांढऱ्या शुभ्र शाडूच्या गणेशमूर्तीच्या आसनापासून ते उपरणे, मुकुट यापर्यंत विविध पर्यावरणपूरक रंग वापरून मूर्तीला सुशोभित करण्यात आले. तसेच मूर्तीचे डोळे आणि सोंडेवरील नक्षीकाम हा अत्यंत अवघड टप्पा देखील सहभागींनी उत्तमपणे पूर्ण केला. तेजोमय कलामंदिरच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सहभागींना मार्गदर्शन केले.

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे दरवर्षी अथर्वशीर्ष व श्रीसूक्त सामूहिक पठण हे देखील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाते. तसेच कन्या पूजन, मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना प्रदान अशा विद्याधन संकल्पनेच्या अंतर्गत विविध उपक्रम या ठिकाणी राबविले जातात. त्याचप्रमाणे हा गणेशमूर्ती रंगविणे हा उपक्रम नुकताच पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!