धर्मब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

तरुण अशोक मंडळातर्फे चार दिवस रक्तदान, दोन दिवस मोफत आरोग्य तपासणी

Spread the love

पुणे : तरुण अशोक मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ आणि लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त सलग चार दिवस भव्य रक्तदान शिबिर आणि दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तरुण अशोक मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडप, ४६८/६९, बुधवार पेठ, विष्णू भवन, बुधवार चौक ते पासोड्या विठोबा मंदिर रस्ता, पुणे – ४११००२ येथे आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रक्तदान शिबिर दि. २० ते २३ सप्टेंबर २०२६ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. रक्तदान हे जीवनदान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच दि. २० व २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, आय ड्रॉप्सचे वितरण, कान-नाक-घसा तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गरजू व्यक्तींना मोफत चष्म्यांचे वितरणही केले जाणार आहे.

या उपक्रमास शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयाचे विशेष सहकार्य लाभणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि गरजू रुग्णांना मदत करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

युवक, महिला, गणेशभक्त, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे तसेच मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही माहिती तरुण अशोक मंडळाचे अध्यक्ष श्री. मनीष भागणे, ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संजय तावरे आणि लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीचे प्रेसिडेंट श्री. दिलीप नेवे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!