ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्रशहर

तामिळनाडू मध्ये देशभरातून आलेल्या मराठी साहित्यिकांचे जल्लोषात स्वागत

तंजावर मध्ये रंगणार ऐतहासिक साहित्य संमेलन

Spread the love

चेन्नई (तामिळनाडू) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन २३ सप्टेंबर रोजी तंजावर (तामिळनाडू) येथे संपन्न होत आहे. छ शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी महाराजांचे वारसदार सरफोजीराजे द्वितीय यांनी दक्षिण भारतात मराठी साहित्य, संस्कृती, कला, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तमिळ आणि मराठी साहित्य संस्कृतीचा संगम सरफोजीराजेंनी घडवून आणला. तंजावर हे प्रमुख सांस्कृतिक केंद्र बनवले. म्हणून तंजावर मध्ये सव्वातीनशे वर्षांनंतर प्रथमच मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या संमेलनासाठी महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, अशा विविध भागातून शेकडो साहित्यिक रेल्वेद्वारे चेन्नई मध्ये दाखल झाले आहेत. यावेळी तंजावरच्या संस्थानाचे युवराज आणि साहित्यसंमेलनाचे निमंत्रक युवराज संभाजीराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरफोजीराजे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी सर्व साहित्यिकांचे जल्लोषात स्वागत केले. सर्व साहित्यिकांना पुष्प आणि मानसन्मान देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंढरपूर मधून सोलापूर पर्यंत पायी चालत आलेल्या आणि तिथून रेल्वेद्वारे तामिळनाडू (चेन्नई) येथे पोहोचलेल्या पंढरपूरच्या ग्रंथदिंडीचे पूजन करून विशेष स्वागत करण्यात आले.

चेन्नई येथे रेल्वे स्थानकावर छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, छ. व्यंकोजी महाराज आणि छ. सरफोजीराजे यांच्या जयजयकारच्या घोषणा देण्यात आल्या. रेल्वेस्थानकातून सर्व साहित्यिक पंढरीची ग्रंथ दिंडी घेऊन मराठीचा जयजयकार करत महाबलीपुरम मार्गे विशेष वाहन व्यवस्थेने एकत्रित संमेलनासाठी रवाना झाले आहेत. सरफोजीराजे (द्वितीय) मराठी साहित्य संमेलन हे ग्रंथदिंडी, उद्घाटन, परिसंवाद, कविसंमेलन, साहित्य पुरस्कार आणि समारोप अशा सत्रांत पार पडणार आहे. याद्वारे दक्षिण भारतात मराठीचा जागर होणे, कला, साहित्यिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मराठी व तमिळ भाषांचा एकोपा कायम रहावा हाच यामागील उद्देश आहे.

तंजावर मराठा संस्थानचे प्रमुख छ. बाबाराजे भोसले हे या संमेलनाचे उद्घाटक असून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गोरे हे या संमेलनाचे अध्यक्ष असून त्यांचाच मार्गदर्शनाखाली हे संमेलन पार पडत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!