धर्मब्रेकिंग न्यूज़मराठीशहर
आंतरशालेय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेने ‘सूर्यदत्त’मध्ये कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला-क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आवश्यक - प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

विचार व निर्णयक्षमता, एकाग्रता, बौद्धिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी बुद्धिबळ उपयुक्त
राजेंद्र कोंडे यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त नॅशनल स्कुलमध्ये आयोजित वार्षिक आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग
पुणे : सूर्यदत्त नॅशनल स्कूल, सूर्यदत्त फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमी आणि पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल (पीडीसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक आंतरशालेय खुली बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना आपली बुद्धिमत्ता, कौशल्ये व क्रीडागुण सादर करण्यासाठी सूर्यदत्त शिक्षण संस्थेत आयोजित कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात बुद्धिबळ स्पर्धेने झाली. शालेय स्तरावरील या भव्य स्पर्धेत विविध नामांकित शाळांमधील ७, १०, १५ व २० वर्षांखालील अशा चार गटात ३०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि रणनिती कौशल्यांचे दर्शन घडले. स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी उत्तम खेळी करत आपल्यातील रणनीती, एकाग्रता आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.
सात वर्षाखालील गटात आराध्य लोकेश गिरीपुंजे, मुग्धा अभिषेक केळकर, पार्थ परमार, ऋद्धेश श्रीकांत कुलकर्णी, सिद्धांत नायर, तर १० वर्षांखालील गटात अनिश अभिजित जवळकर, विहान हिमांशू शाह, जयदेव राणा मांडा, तनिष्क धाकटे, हृदान वारघणे, १५ वर्षांखालील गटात लथिक राम, अविरत चौहान, ऋतम मोहगावकर, अद्वैत कुमार, चतुर्थी परदेशी, तर वीस वर्षांखालील गटात अद्विक अमित अग्रवाल, गर्व देवणानी, अवधूत लोकेश ब्रह्मे, ओजस देवशतवार, विराज सराफ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकवला. उत्कृष्ट बुद्धिबळपटूंना एक लाखाहून अधिक रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन फिडे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जयंत गोखले आणि महिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू मृणालिनी कुंटे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष, तसेच महाराष्ट्र चेस सर्कलचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षिसे देण्यात आली. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या स्पर्धेवेळी ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा, सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ. अनुपमा नेवरेकर, उपप्राचार्या व स्पर्धेच्या समन्वयक प्राजक्ता पाटकर आदी उपस्थित होत्या.
राजेंद्र कोंडे म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी आवड आणि रुची निर्माण होण्यासाठी अशा आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते. तसेच, त्यांच्यातील विचारक्षमता, एकाग्रता, निर्णयक्षमता आणि रणनीती आखण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होते. उदयोन्मुख बुद्धिबळपटूंच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची प्रेरणाही अशा स्पर्धांमधून मिळते. सूर्यदत्त संस्थेने गेल्या काही वर्षांपासून या स्पर्धेचे सातत्याने उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आयोजन केले आहे. यंदाही स्पर्धेचे आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सहभागी युवा खेळाडूंचे कौतुक केले. बुद्धिबळाकडे समर्पण आणि आवडीने पाहण्याचे आवाहन करताना अशा स्पर्धांमधील सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. बुद्धिबळासारख्या खेळामुळे एकाग्रता, संयम, शिस्त, विश्लेषणात्मक विचारशक्ती आणि आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची क्षमता विकसित होते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकत राहावे, सराव करावा आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहावे. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्णयक्षमता, एकाग्रता, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि खिलाडूवृत्ती विकसित होण्यास मदत होते. तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांना एकत्र येऊन आपले कौशल्य सादर करण्याची आणि एकमेकांकडून शिकण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा महत्त्वाचा भाग असून, केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता क्रीडा, कला, सांस्कृतिक, बौद्धिक आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष कला, आवड आणि क्षमता दडलेली असते. या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. सूर्यदत्त संस्थेतर्फे विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आवडीनिवडी आणि कलागुणांनुसार विविध स्पर्धा व उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येते. बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळांबरोबरच इतर क्रीडा प्रकार, कला, सांस्कृतिक आणि सर्जनशील क्षेत्रांतील स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमांमागील मुख्य हेतू आहे, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “युवापिढीला मोबाइलपासून दूर ठेवत वाचन, लेखन, विचार आणि शारीरिक तंदुरुस्ती याकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे. शैक्षणिक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांना क्रीडा व कौशल्यांचा विकास साधता यावा, यासाठी सूर्यदत्त संस्था नेहमीच अशा नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देते. त्यातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक तंदुरुस्तीला, ध्येयासक्ती आणि शिस्तीला चालना मिळते.”
स्नेहल नवलखा म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आव्हानांना सामोरे जाण्याचे, खंबीर राहण्याचे आणि निष्ठा व आत्मविश्वासाने आपल्या कौशल्यांना अधिकाधिक सक्षम करा. सामना हरणे किंवा जिंकणे हे महत्वाचे नाही, तर आपल्याला मिळालेल्या संधीतून नव्या गोष्टी शिकणे अधिक महत्वाचे असते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता वाढवण्यासह त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
—————-



