
पुणे : स्वर्गीय पायल तिवारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पायल तिवारी बिटिया फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सातवा पायल तिवारी बिटिया फाउंडेशन शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २०२६ चा पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर रोजी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन हॉल, नवी पेठ, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या वर्षीच्या महोत्सवाला देशभरातून तब्बल ७१५ लघुपटांची नोंदणी झाली होती. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध संवेदनशील विषयांवर आधारित या लघुपटांमधून उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यात आली. तीन कालावधीच्या चित्रपट श्रेणी आणि एक रील्स श्रेणी अशा एकूण चार विभागांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक श्रेणीतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय आठ लघुपटांना विशेष उल्लेख (Honourable Mention) पुरस्कार देण्यात आले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. स्वप्नाली विश्वजीत कदम (फाउंडर अँड चेअरपर्सन, भारती विद्यापीठाचे रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्स), पुण्याचे माजी उपमहापौर श्री. दीपक भाऊ मानकर, श्री. विद्याधर उर्फ बाळासाहेब अनास्कर,संचालक NAFSCOB.
डॉ. संजय चोरडिया (संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूट), सौ. सुषमा चोरडिया (संचालिका, सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूट), डॉ. महेश थोरवे (संचालक, एमआयटी इन्स्टिट्यूट) आणि चित्रपट अभिनेत्री शिल्पा चौधरी उपस्थित होते.
यावेळी बिटिया फाउंडेशनच्या उपाध्यक्ष ॲड. रूपाली पाटील ठोंबरे यांचीही उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या दिग्दर्शकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून तरुण चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या कलागुणांचे कौतुक केले.
विविध श्रेणींमधील विजेते आणि दिग्दर्शक
पहिली श्रेणी
– प्रथम क्रमांक – Must – दिग्दर्शक : राहुल राठोड (₹३०,०००)
– द्वितीय क्रमांक – WHY? – दिग्दर्शक : सोहम पवार आणि ध्रुव पुजारी (₹२२,०००)
– तृतीय क्रमांक – Aai – दिग्दर्शक : नरेश माळी (₹१५,०००)
दुसरी श्रेणी
– प्रथम क्रमांक – Saprem (With Love) – दिग्दर्शक : रविकांत सोईतकर
– द्वितीय क्रमांक – Darmiyaan – दिग्दर्शक : शिवांश श्रीवास्तव
– तृतीय क्रमांक – Jigu Vighu – दिग्दर्शक : संकेत कोळे
तिसरी श्रेणी
– प्रथम क्रमांक – Vaarsa – दिग्दर्शक : शुभम घाटगे
– द्वितीय क्रमांक – Daddu Zindabad – दिग्दर्शक : समर जैन
– तृतीय क्रमांक – Rekha – दिग्दर्शक : शेखर बापू रणखांबे
रील्स श्रेणी
– प्रथम क्रमांक – Ghungroo – दिग्दर्शक : व्यंकटेश सुम्बे (₹१०,०००)
– द्वितीय क्रमांक – High Five – दिग्दर्शक : व्यंकटेश सुम्बे (₹७,०००)
– तृतीय क्रमांक – Youth Bachao – दिग्दर्शक : अथर्व शालिग्राम (₹५,०००)
आठ लघुपटांना विशेष उल्लेख पुरस्कार
महोत्सवामध्ये उत्कृष्ट विषय मांडणी आणि सामाजिक संदेशासाठी खालील आठ लघुपटांची विशेष उल्लेख पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
१. Touch & Go – वल्लभ मधुकर रावण
२. Addiction – अक्षय प्रकाश वस्कर
३. The Can – अर्चित कुलकर्णी
४. Identity – अमर भारत देवकर
५. Miss Burkha (A Girl Beyond Religion) – पराग चौधरी
६. 16th After Azadi – अभिषेक प्रताप सिंह गेहलवार
७. We Heard the World Looks Beautiful – श्रेयस मांढरे
८. Santulan – योगी सिंह ठाकूर
या विशेष पुरस्कार विजेत्यांना फिल्म मेकिंगसाठी उपयुक्त साहित्य आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
७१५ लघुपटांचे परीक्षण करणे म्हणजे मोठे आव्हान!
या महोत्सवाच्या यशामागे परीक्षक मंडळाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका होती. सेन दाभोळकर, शिवराज वाळवेकर, विशाल गोरे, सचिन दनाय आणि जहीर दरबार या परीक्षकांनी ७१५ लघुपटांचे परीक्षण करण्याचे मोठे आव्हान स्वीकारले.
प्रत्येक परीक्षकाला साधारण शंभर ते दीडशे लघुपट पाहून त्यातील विषय, मांडणी, दिग्दर्शन, अभिनय आणि तांत्रिक गुणवत्ता यांचा अभ्यास करावा लागला. त्यानंतर सामूहिक चर्चेतून अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या लघुपटांमधून उत्कृष्ट कलाकृतींची निवड करणे हे निश्चितच जिकिरीचे काम होते.
या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल परीक्षक मंडळातील सदस्यांचा भेटवस्तू, सन्मानचिन्ह, शाल आणि तुळशीचे रोप देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
निवड न झालेल्या उत्कृष्ट लघुपटांनाही मिळणार व्यासपीठ!
या कार्यक्रमातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्याचे माजी उपमहापौर दीपक भाऊ मानकर यांनी पुण्यामध्ये निवड न झालेल्या मात्र आशय आणि कलात्मक दृष्टिकोनातून उत्कृष्ट असलेल्या लघुपटांचे तीन ते चार दिवस विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
यामुळे स्पर्धेत पारितोषिक न मिळालेल्या दिग्दर्शकांनाही आपली कलाकृती मोठ्या प्रेक्षकांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांचे काम चित्रपट क्षेत्रातील जाणकारांपर्यंत पोहोचण्यास आणि भविष्यातील करिअरसाठी संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष स्वागत केले.
संगीता तिवारी : चित्रपट हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम!
यावेळी बोलताना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती संगीता तिवारी म्हणाल्या,
“माझी मुलगी स्व. पायल तिवारी हिच्या स्मृती जपण्याबरोबरच तिच्या नावाने समाजासाठी काहीतरी सकारात्मक आणि अर्थपूर्ण काम उभे करणे, हीच आमची भावना आहे. शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून नवोदित दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना चित्रपटांच्या माध्यमातून वाचा फोडणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. यंदा ७१५ लघुपटांची नोंदणी झाली, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. प्रत्येक चित्रपटामागे एका दिग्दर्शकाचे स्वप्न, मेहनत आणि सामाजिक विचार असतो. त्यामुळे पुरस्कार मिळाला किंवा नाही, तरी प्रत्येक सहभागी दिग्दर्शकाचे योगदान महत्त्वाचे आहे. यापुढेही अशा कलावंतांना अधिकाधिक संधी देण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील राहील.”
कार्यक्रमाच्या शेवटी फाउंडेशनचे उपाध्यक्ष पुनमित तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी सर्व मान्यवर, परीक्षक, सहभागी दिग्दर्शक, कलाकार, प्रायोजक आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
स्व. पायल तिवारी यांच्या स्मृतींना अभिवादन करत नव्या पिढीच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक जाणिवांना कलात्मक अभिव्यक्ती देणारा हा सातवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल यशस्वीरीत्या संपन्न झाला.



