सिद्धी ही कार्याच्या प्रामाणिकपणावर ठरते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न. म. जोशी यांचे मत
श्री संत सेना महाराज नाभिक एकता संघाच्यावतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम

पुणे : प्रसिद्धी ही नेहमी कार्याच्या प्रामाणिकपणावर ठरते. समाजात आज केवळ विसंवाद, वाद-विवाद आणि स्पर्धा हे पहायला मिळतात. आजच्या काळात समाजातले मूर्ख, स्वार्थी लोक यांची योग्य ती ‘हजामत’ होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले
श्री संत सेना महाराज नाभिक एकता संघ पुणे शहराच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन पद्मावती येथील विणकर सभागृहात करण्यात आले होते. यावेळी बाळकृष्ण भामरे आणि संजय चित्ते यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रामदास सैंदाणे, भिकन वाघ, मनोज अहिरराव, योगेश फुलपगारे, समाधान निकम, पंडित निकम, कैलास नेर पगारे, योगेश पगारे, सुनील पगारे, विलास बोरसे, कमलेश वेळीस, दीपक निकम, डॉ. अरविंद झेंडे, प्रशांत राऊत, शशांक सुर्वे, मंगेश वेळीस, चंद्रकांत जगताप यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. न.म. जोशी म्हणाले, खरी ताकद भक्तीत असते. संत सेना महाराजांची विठ्ठलभक्ती इतकी निर्मळ, नि:स्वार्थ आणि परिपूर्ण होती की स्वतः विठ्ठल त्यांच्या सेवेसाठी धावून आला. खरी मोठेपणाची कसोटी ही यश, पैसा किंवा मानमरातब यात नसून भक्ती, सेवाभाव आणि समाजहित यात आहे.
श्री संत सेना महाराज पालखी सोहळ्याने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दिवसभरात प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, प्रवचन यांसह उपस्थितांची मनोगते झाली. पालखी सोहळ्यासह दिवसभर आयोजत करण्यात आलेल्या कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.