जीवन शैलीब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

उद्याचे जग एआयवर नव्हे ज्ञानोबा – तुकोबांच्या मंत्रावर चालेल _ विश्वास पाटील यांचे विचार

३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचा समारोप समारंभ

Spread the love

पुणे: ” सध्याचे जग हे एआयचे बनत आहे. एआय तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मानवी बुद्धिमत्ता महत्वाची असून उद्याचे जग हे एआय च्या तंत्रावर नव्हे ज्ञानोबा – तुकोबांच्या मंत्रावर चालेल.” असे विचार ज्येष्ठ लेखक आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 

यावेळी एमकेसीएलचे वरिष्ठ सल्लागार व शास्त्रज्ञ डॉ. विवेक सावंत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे हे यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी विश्वशांतीच्या जीवन कार्यासाठी उपस्थित सर्वांच्या वतीने डॉ. विश्वनाथ कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. योगगुरू अनंत कोंडे व मारूती पाडेकर गुरूजी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पीस स्टडीज च्या वतीने ‘सेंटर फॉर एक्सेलेन्स इन संस्कृत अँड आयआरएस स्टडीज’ कोर्सच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

विश्वास पाटील म्हणाले, ” शिवाजी महाराजांना जिजाऊंनी विश्वशांतीची प्रेरणा दिली. त्यांच्यावर संतांच्या विचारांचा प्रभाव होता. शक्ती, युक्ती आणि भक्तीचा संगमातून स्वराज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्यातून मानवी जातीचे कल्याण केले. म्हणून शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ राजे झाले.”

 

डॉ. विवेक सावंत म्हणाले, ” विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामधील अद्वैत कल्पना ही आपली संतपरंपरा आहे. ती पुढे नेण्याचे काम डॉ. कराड सरांनी केले.आज बहुविद्याशाखीय शिक्षण व्यवस्थेची गरज असून त्यातूनच भारत आत्मनिर्भर होईल. विद्यार्थ्यांना स्व चा शोध घ्यायला शिकवा. स्व च्या शोधाच्या साधनेतून विश्वशांती प्राप्त होईल.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा संदेश जगभर पसरविण्यासाठी या व्याख्यानमाला महत्वपूर्ण आहेत. ज्ञानोबा तुकोबा टाळकुट्यांचा विषय नाही, हे एक चांगले जीवन जगण्याचे सारं आहे. माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी संतांचाच एकमेव मार्ग आहे.”

डॉ.आर. एम. चिटणीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!