आम्ही केवळ भाषण करुन निघून जाणारे लोक नाहीत. दिलेली आश्वासने पूर्ण करणारे लोक आहोत_ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रशांत कुऱ्हाडे यांना मतदान करण्याचे आवाहन

आळंदी प्रतिनिधी (बद्रीनारायण घुगे ).मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यापेक्षा अधिक वाहतूक कोंडी आळंदीत, ‘रिंगरोड’…आळंदी नगरपरिषदेतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
‘तीर्थक्षेत्र आळंदीत मोठ्या संख्येने लोक येतात. प्रचंड वाहतूक कोंडी होते. पुण्यापेक्षा वाईट अवस्था आळंदीत होते. येथील वाहतुकीचे संचलन व्यवस्थित झाले पाहिजे. त्यासाठी आळंदीला बायपास वर्तुळाकर मार्ग (रिंगरोड) केला जाणार आहे. त्यासाठी ५८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या माध्यमातून आळंदीतील वाहतुकीची कोंडी सोडवता येईल’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले. ‘आम्ही केवळ भाषण करुन निघून जाणारे लोक नाहीत. दिलेली आश्वासने पूर्ण करणारे लोक आहोत’, असेही ते म्हणाले.

आळंदी नगरपरिषदेतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव राजेश पांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे यावेळी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आळंदी हे छोटे शहर असून पुण्यनगरी आहे. देशभरातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येतात. हे शहर चांगले असावे. सर्व सुविधा असाव्यात. यासाठी नगरपरिषदेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे. देशावर ६५ वर्षे एका विचाराचे लोक राज्य करित होते. त्यांना शहरांचा विसर पडला होता. गावातून लोक शहरात आले. शहरे वाढली, अतिक्रमण, पिण्याचे पाणी, गटारी, घनकचरा व्यवस्थापन झाले नाही. शहरी जीवनमान उंचावण्याऐवजी खालावले. शहरे बकाल व्हायला लागली. महाराष्ट्रात साडेसहा कोटी लोक ग्रामीण आणि साडेसहा कोटी शहरांमध्ये राहतात. या लोकांना मुलभूत सुविधा दिल्या नाहीत. ६५ वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराच्या विकासाची योजना आणली. स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत शहरी, हरघर जल, सर्वांसाठी घरे शहरी योजना आणली. ५० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्याच्या माध्यमातून शहरे चांगली केली. शहराचे चित्र बदलू लागले. २०१७ मध्येही नगरपरिषदेत भाजपची सत्ता आल्यानंतर पिण्याच्या पाण्याची योजना केली. दहा दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी दिले. शहराची लोकसंख्या वाढत असून येथे लाखो लोक येत आहेत. त्यांच्यासाठी सुधारित ३२२ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे’.



