मराठी

बारावे विश्वबंधुता विद्यार्थी व शिक्षक साहित्य संमेलन ८ ऑगस्टला पिंपरीत

डॉ. शमसुद्दीन तांबोळी व डॉ. जयकुमार ताम्हाणे यांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार'

Spread the love
बंधुताचार्य प्रकाश रोकडे व स्वागताध्यक्ष डॉ. पांडुरंग भोसले यांची पत्रकार परिषदेत माहिती

पिंपरी : विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारावे विश्वबंधुता साहित्य संमेलन आयोजित केले आहे. येत्या शुक्रवारी (ता. ८ ऑगस्ट) सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शमशुद्दीन तांबोळी आणि ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. जयकुमार ताम्हाणे यांना जाहीर झाला आहे. तिरंगा महावस्त्र, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिकृती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे व संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी बंधुता परिषदेचे सचिव प्रा. शंकर आथरे, कवयित्री संगीता झिंजुरके, बंधुता प्रकाशनच्या संचालिका मंदाकिनी रोकडे उपस्थित होते.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या हस्ते होणार असून, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे, कादंबरीकार प्रा. शंकर आथरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारच्या सत्रात पत्रकार-कवी पितांबर लोहार यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोकजागर अभिजात मराठी’चा हे काव्यसंमेलन होणार असून, त्यामध्ये प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया, संगीता झिंजुरके, सीमा गांधी, संतोष घुले, डॉ. बंडोपंत कांबळे यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कवींचा सहभाग असणार आहे.”

डॉ. पांडुरंग भोसले म्हणाले, “संमेलनाचा समारोप पुरस्कार वितरणाने होईल. यावेळी औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षा प्रा. भारती जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब वाघेरे यांना ‘महात्मा फुले समाजसेवक पुरस्कार’, शिवव्याख्यात्या सुलभा सत्तूरवार यांना ‘विश्वबंधुता लोकशिक्षक पुरस्कार’ प्रदान केला जाईल. संमेलनामध्ये निवडक विद्यार्थ्यांना ‘गुणवंत विद्यार्थी’, तर काही शिक्षकांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार दिले जातील. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. संगीता अहिवळे, डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. मारुती केकाणे, प्रा. प्रशांत रोकडे आणि प्रा. सायली गोसावी यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!