महार रेजिमेंट मुख्यालय बाबासाहेबांचा पुतळा उभारणार : रामदास आठवले

पुणे . भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंटच्या मध्य प्रदेश येथील मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंट मध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व सैनिकांकडून गेल्या 40 वर्षांपासून रेजिमेंटच्या मुख्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करावा अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भामध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर याबाबत आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आज पाषाण येथील यशदा येथे नीती आयोगाच्या कार्यक्रमासाठी रामदास आठवले आले होते, यावेळी महार रेजिमेंट व रिपब्लिकन युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने आठवले यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले होते.
यावेळी बोलताना आठवले यांनी ” आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभारावा यासाठी आग्रही आहोत , यासंदर्भात राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांचेही मत सकारात्मक तयार करणार आहे. दरम्यान या प्रश्नावर गरज पडल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही सुद्धा भेट घेऊ असे स्पष्ट आश्वासन आठवले यांनी दिले.
रामदास आठवले यांना भेटलेल्या शिष्टमंडळात राहुल डंबाळे यांच्या समवेत संतोष वानखेडे , बुद्धा चव्हाण , राहुल ससाने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.