
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कारांचे वितरण
पुणे. “भवतालात अन्याय, अत्याचाराच्या घटना घडताहेत. महिला सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होतोय. जाती-धर्माच्या नावावर समाज विभागला जात आहे. आर्थिक विषमता वाढतेय. अशावेळी मानवी जीवनात समानतेचा धागा विणून प्रत्येक घटकाला सन्मान देणारा बंधुतेचा विचार अधिक व्यापक व्हायला हवा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी केले.
स्वांतत्र्य व समता आणण्यासाठी कायद्याचा उपयोग होऊ शकतो; मात्र, बंधुता काळजातून यावी लागते. त्यामुळे संविधान आदर्शवादी आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक व्यक्तीला समान न्याय, स्वातंत्र्य आणि सन्मानाची वागणूक द्यायची असेल, तर त्याला बंधुतेच्या विचारांची जोड द्यावीच लागेल, असे प्रतिपादन २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांनी केले.
विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी डॉ. धोंगडे उद्घाटक म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात झालेल्या संमेलनात स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विश्वबंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, कार्याध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे, कादंबरीकार शंकर आथरे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रभू गोरे (संपादक-आधुनिक केसरी, छत्रपती संभाजीनगर), मंगेश कोळपकर (मुख्य वार्ताहर-सकाळ, पुणे), सचिन कापसे (वृत्तसंपादक-लोकमत पुणे), नंदकुमार जाधव (मुख्य उपसंपादक-पुण्यनगरी, पुणे), महेश देशपांडे (वरिष्ठ वार्ताहर-केसरी, अहिल्यानगर), नोझिया सय्यद (वरिष्ठ वार्ताहर-पुणे मिरर), अश्विनी जाधव (वरिष्ठ वार्ताहर-लोकमत ऑनलाईन, पुणे), सागर सुरवसे (वरिष्ठ वार्ताहर-टीव्ही नाईन, सोलापूर), गुलाबराजा फुलमाळी (संपादक-महाराष्ट्र दर्पण, नेवासा) यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार’, तर प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण (पुणे), प्रा. डॉ. संदीप सांगळे (तळेगाव ढमढेरे), प्रा. डॉ. कामायनी सुर्वे (चिंचवड), प्रा. भारती जाधव (वाघोली), हनुमंत चांदुगडे (बारामती), प्रा. डॉ. जयश्री आफळे (सातारा), शरद शेजवळ (नाशिक), विजयकुमार मिठे (नाशिक), दिनकर बेडसे (धुळे), राजू मोहन (देहू), बाळासाहेब गोजगे (तळेगाव दाभाडे), भाऊसाहेब मोते (नाशिक) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अश्विनी धोंगडे म्हणाल्या, “बंधुता चळवळीची आज समाजात गरज आहे. स्त्री-पुरुष समानतेकडे टाकलेले हे पाऊल आहे. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला वाहिलेले हे संमेलन समाजात बंधुभाव पेरण्यासाठी उपयुक्त ठरेल. स्त्रियांना आत्मसन्मानाची जाणीव होत असून, त्यांच्यात धीटपणा येतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यातून मातीत रुजलेल्या स्त्रीवादाचे पुनरुज्जीवन होत आहे. फुले दाम्पत्याने स्त्रीला मानवी जीवनाचा आधार दिला असून, सावित्रीबाई या स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांची माता आहेत. भारतीय स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा डॉ. आंबेडकरांनी मांडला.”
प्रा. सुभाष वारे म्हणाले, “स्वातंत्र्य आणि समता सर्वांनाच हवी आहे. मात्र मनाचा सहजभाव असलेल्या बंधुतेबद्दल फारसे बोलले जात नाही. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता याचे आश्वासन देणारी बंधुता आहे. धार्मिक, भाषिक, जातीय आणि आर्थिक भेदांतून मुक्त करण्यासाठी बंधुतेची रुजवण खूप गरजेची आहे. बंधुतेची भावनाच एकमेकांना आपुलकीच्या भावनेने जोडून ठेवणार आहे. आजच्या स्वार्थी, हव्यासी आणि क्रूरतेचा सीमा ओलांडणाऱ्या काळात बंधुतेचा विचार आपल्याला चांगल्या मार्गावर घेऊन जाईल.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुता चळवळीची सुरुवात पन्नास वर्षांपूर्वी झाली. समाजात बंधुता रुजवण्याचे कार्य करत गेलो. या वाटेवर अनेक चांगले लोक जोडले गेले. साहित्यिक, पत्रकार, समाजसुधारक यांसारख्या विविध क्षेत्रातील व्यक्तींची साथ लाभली. संविधानातील मूल्यांना खेड्यापाड्यात पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.”
प्रा. भारती जाधव, मंगेश कोळपकर, अश्विनी जाधव, नंदकुमार जाधव, गुलाबराजा फुलमाळी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कृष्णकुमार गोयल यांनी स्वागत केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. शंकर आथरे यांनी आभार मानले. मंदाकिनी रोकडे, प्रशांत रोकडे यांनी संयोजन केले.