ताजा खबरमराठी

‌‘सरहद शौर्याथॉन‌’मधून शांती, एकात्मता, सद्भावनेचा संदेश : अजित पवार

सरहद शौर्याथॉन‌’ स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण

Spread the love

22 जून 2025 रोजी झोजी ला वॉर मेमोरिअल ते कारगिल वॉर मेमोरिअल दरम्यान आयोजन

यंदाची स्पर्धा पहलगाम येथे शहीद झालेल्या नागरिकांना समर्पित : संजय नहार

पुणे .कारगील युद्धात भारतीय सेनेने दाखविलेले धैर्य, साहस आणि बलिदान याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेली आंतरराष्ट्रीय ‌‘सरहद शौर्याथॉन‌’ ही फक्त क्रीडा स्पर्धा नसून भारतातील सर्व धर्मीयांना व संस्कृतींना एकत्र आणण्याचा मोलाचा उपक्रम करीत आहे. या स्पर्धेद्वारे शांती, एकात्मकता आणि सद्भावनेचा संदेश दिला जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

झोजी ला युद्ध विजय अमृत महोत्सव आणि कारगील युद्ध विजय रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने 13 जे. के. रायफल्स आर्मी युनिट, द्रास टाऊन, कारगिल डिस्ट्रिक, लडाख यु. टी. यांचे युनिट, सरहद, पुणे आणि अर्हम्‌‍ फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 जून 2025 रोजी लडाख येथील झोजी ला वॉर मेमोरिअल ते कारगिल वॉर मेमोरिअल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‌‘सरहद शौर्याथॉन‌’ 2025 स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते आज (दि. 25) व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे झाले. त्या वेळी पवार बोलत होते. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, अर्हम्‌्‌‍ फाऊंडेशन, पुणेचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, टेक्निकल रेस डायरेक्टर वसंत गोखले, सरहदचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, लेशपाल जवळगे, संतोष बालवडकर, अर्हम्‌्‌‍ फाऊंडेशन, पुणेचे विश्वस्त स्वराज पगारिया आदी उपस्थित होते. दिनेश कोल्हे यांनी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

 

काश्मीरमध्ये सरहद संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून अजित पवार पुढे म्हणाले, युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणाप्रित्यर्थ 2017 पासून ‌‘सरहद शौर्याथॉन‌’चे आयोजन करण्यात येत असून स्पर्धा देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे.

 

पहलगाम येथे झालेल्या नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून अजित पवार म्हणाले, या घटनेचा भारतातूनच नव्हे तर जगभरातून तीव्र निषेध नोंदविला जात आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची भावना आहे. सर्व जण पेटून उठले आहेत. पंतप्रधानांनी तातडीने पावले उचलली आहेत.

 

स्पर्धेविषयी माहिती देताना सुमंत वाईकर म्हणाले, जगाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. या वर्षी अडीच ते तीन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्त्री व पुरुष विभागासाठी पाच, दहा आणि 21 किमी तर मुली आणि मुलांसाठी तीन किमीची स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेतील विजेत्यांना भरघोसे बक्षीस देऊन गौरविले जाते. स्पर्धेसाठी 13 जे. के. रायफल्स आर्मी युनिट, द्रास टाऊन, कारगिल डिस्ट्रिक्ट, लडाख यु. टी. युनिटचे मुख्य अधिकारी कर्नल राजेश बांदे यांचे सहकार्य लाभले आहे. वर्ल्ड ॲथेलेटिक आणि इंडियन ॲथेलेटिक यांच्या नियमानुसार ही स्पर्धा होत आहे.

 

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सरहद संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याची माहिती देताना संजय नहार म्हणाले, काश्मीरमधील युवकांच्या सहकार्याने अडकलेल्या पर्यटकांना निवास, भोजनासह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर समाजमाध्यमांद्वारे काश्मीरमधील सामाजिक स्थितीबाबत अयोग्य माहिती पसरविली जात आहे. पण सरहदच्या माध्यमातून पुण्यात शिक्षण घेऊन परतलेल्या काश्मिरी युवकांनी केलेल्या मदतीमुळे लोकभावना बदलली असून सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाची स्पर्धा पहलगाम येथे शहीद झालेल्या नागरिकांना समर्पित करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!