ब्रेकिंग न्यूज़मनोरंजनमराठी

कृत्रिम बुद्धिमतेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील – अच्युत गोडबोले

'समवेदना'च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त 'एआयची जादू आणि उद्याचे जग'वर व्याख्यान

Spread the love
पुणे .  “कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटी, नॅनो टेक्नॉलॉजी, स्पेस मायनिंग अशा अनेकानेक तंत्रज्ञानांमुळे सध्याची जगण्याची पद्धत आणि व्यवस्था झपाट्याने बदलत आहे. वैद्यकीय क्षेत्रातही ‘एआय’मुळे अत्याधुनिक उपकरणे, उपचारपद्धती यामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. येणारा काळ हा कल्पने पलीकडील तंत्रज्ञानाचा आणि वेगवान असणार आहे,” असे मत प्रसिद्ध लेखक व तंत्रज्ञानाचे अभ्यासक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले. ‘एआय’मुळे सर्वच व्यवसाय आणि रोजगाराचे स्वरूप बदलणार असून, नवीन बदल, तंत्रज्ञान आत्मसात करणे सर्वच वयोगटांना अनिवार्य आहे असेही त्यांनी नमूद केले.

समवेदना संस्थेच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त देणगीदारांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अच्युत गोडबोले यांचे ‘एआयची जादू आणि उद्याचे जग’ या विषयावर व्याख्यान झाले. गोडबोले यांनी खास त्यांच्या शैलीत गप्पा, गोष्टी आणि ‘एआय’चा इतिहास, वर्तमान, आरोग्य क्षेत्रातला उपयोग आणि भविष्यातील परिणाम यांची सुरेख सफर घडवली. एमईएस बालशिक्षण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ‘समवेदना’चे  विश्वस्त प्रकाश तुळपुळे, सल्लागार राजीव साबडे, मुख्य व्यवस्थापक अमर पवार आदी उपस्थित होते.


अच्युत गोडबोले म्हणाले, “माणसाला पडणारे प्रश्न आणि त्यावर शोधलेली उत्तरे माणसाच्या उत्क्रांतीमधील महत्त्वाचा घटक आहेत. माणसाने कल्पनाशक्तीच्या बळावर स्वतःच्या सुखासाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या. प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण स्वत:च्याच मेंदूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटी, नॅनो टेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनीअरिंग, स्पेस मायनिंग अशा अनेकानेक तंत्रज्ञानांमुळे सध्याची जगण्याची पद्धत आणि व्यवस्था या नव्या जगात कालबाह्य ठरतील. आगामी काळात युद्धसुद्धा रोबोटच्या साहाय्याने होतील.”

“अनेक क्षेत्रात आपल्या रोजच्या कामाची जागा ‘एआय’ घेईल. ‘एआय’ सद्यस्थितीत मध्यस्थ म्हणून काम करत आहे. मात्र, येत्या काळात स्वतःहून विचार करायला लागले, निर्णय घ्यायला लागले, त्यामध्ये भावनिक स्पर्श निर्माण झाला, तर नव्या स्वरूपाची आव्हाने उभी राहतील. विविध क्षेत्रातील नोकऱ्या नष्ट होतील, असे बोलले जात आहे. मात्र, नव्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. परदेशांत ‘एआय’चा वापर करून शेती होत आहे. कलाविष्कार, लेखन ‘एआय’मुळे सहज शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे आपली कल्पनाशक्ती विकसित करण्यासह नवे बदल आत्मसात करणे गरजेचे आहे,” असेही गोडबोले यांनी नमूद केले.

अमर पवार यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आरोग्य क्षेत्रात कार्यरत समवेदना संस्था उपचार, प्रतिबंध आणि प्रसार या त्रिसूत्रीवर आधारित उपक्रम राबविते. गरीब रुग्णांना आर्थिक मदत, शालेय आरोग्य व महिलांसाठी कॅन्सर उपक्रमासोबत मानसिक स्वास्थ्याचा विषयही हाती घेतला आहे. यंदा समवेदना उपक्रमांचा २०,००० हून अधिक शहरी व ग्रामीण व्यक्तीनी लाभ घेतला. त्यांच्या सामाजिक आणि मानसिक समस्या समोर येत आहेत. त्यावर संस्थेने काम सुरु केल्याचे पवार यांनी नमुद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!