आयआयएमएस तर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा

पुणे : दि. ०५ सप्टेंबर २०२५ :यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस आपल्या सर्वांना विद्यार्थी आणि समाजाचे भविष्य घडवण्यात शिक्षकांच्या अमूल्य योगदानाची जाणीव करून देतो,असे मत आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी अध्यापक वर्गाने व्यक्त केलेल्या मनोगतातून आयुष्यभर सर्वांनी नवनवीन गोष्टी शिकण्याची भूमिका अंगीकारावी असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कविता,मनोगत आणि सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.या कार्यक्रमाला एमबीए विभाग प्रमुख डॉ. वंदना मोहांती, एमसीए विभाग प्रमुख डॉ. अश्विनी ब्रह्मे यांच्यासह सर्व अध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.
सोनाली पवार,नताशा दलाल, रुची मिश्रा, रिया मिरजकर आणि फाल्गुनी पाटील या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे संयोजन करण्यात मोलाचे सहकार्य केले.