ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्र

हुंडामुक्त महाराष्ट्र – हिंसामुक्त कुटुंब जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा – सुप्रिया सुळे

येत्या २२ जून २०२५ पासून राज्यव्यापी लढ्याचा निर्धार

Spread the love

महाराष्ट्राची लेक स्व. वैष्णवी कस्पटे – हगवणे हिचा अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी झाला ही घटना मनाला प्रचंड वेदना देणारी घटना आहे. ज्या राज्याने स्त्री-मुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले तेथे वैष्णवी सारख्या लेकीचा बळी जाणे हे अतिशय संतापजनक आहे. कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र आज सुन्न झाला आहे. त्यासाठी केवळ संताप आणि दुःख व्यक्त करून भागणार नाही तर जोरदारपणे कृतिशील जागृतीचे पाऊल उचलावे लागेल. म्हणून येत्या २२ जून २०२५ पासून राज्यात हुंडाबळी व हिंसामुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारण्याचा निर्धार करतो आहोत. समाजातील सर्व घटकांचा, सर्व यंत्रणांचा सहभाग यात घ्यावा लागेल. आणि त्या मोहिमेतूनच “हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचे” उद्दिष्ट सध्या करता येईल आणि वैष्णवीला तीच खरी श्रद्धांजली ठरेल.

तीन दशकांपूर्वी महाराष्ट्र राज्याने देशातील पहिले महिला धोरण २२ जून १९९४ रोजी आदरणीय पवार साहेबांच्या पुढाकाराने जाहीर केले. ते धोरण तयार करण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व घटकांनी आणि यंत्रणांनी आपले योगदान दिले होते.
त्यामुळे अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक बदल राज्यातील महिलांच्या जीवनात घडले. परंतु तरीही हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा, महिलांना सहन करावा लागणारा कौटुंबिक हिंसाचार आपण थांबवू शकलेलो नाही हे वास्तव आहे. महाराष्ट्र हा शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी घडवलेला आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर अशा तेजस्वी आणि कर्तृत्ववान महानुभावांची परंपरा या राज्याला आहे. गेली ५० वर्षे राज्यामध्ये विविध संस्था, संघटना आणि व्यक्ती स्त्री पुरुष समतेची चळवळ कष्टाने आणि नेटाने पुढे नेत आहेत. हे सर्व पूर्वसंचित सोबत घेऊन येत्या २२ जून २०२५ पासून पुण्यातून या मोहिमेची सुरुवात मी करत आहे. संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या टप्प्यात ही मोहीम राज्याच्या सर्व भागात राबविण्यात येईल. आणि यामोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळे याबाबतच्या तुमच्या सूचनांचे आणि आपल्या कृतिशील सहभागाचे आवाहन मी आपल्याला करत आहे. माझे सर्व भावा – बहिणींना नम्र आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन “हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसाचार मुक्त कुटुंब” घडविण्यासाठी एकदिलाने काम करूया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!