आजीच्या शिक्षणासाठी खेड तालुक्यातील नातवंडांची उत्स्फूर्त मदत

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : ऊर्मी संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यात सुरू असलेल्या प्रौढ साक्षरता वर्गात ज्येष्ठांचा लक्षणीय सहभाग वाढत आहे. यासाठी खेड तालुक्यातील विविध गावागावांतून आजीच्या शिक्षणास नातवंडे पुढे सरसावली आहेत. आजीला साक्षर करण्यासाठी नातवंडे प्रयत्नशील झाल्याने जेष्ठ नागरिकांचे साक्षरतेस उपयुक्त ठरत आहे. पवळे वस्ती कडूस, मेदनकरवाडी, खालूंब्रे आदी ठिकाणी साक्षरता वर्ग सुरु असल्याचे उर्मी संस्थेचे प्रमुख राहुल शेंडे यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकीतून हे वर्ग घेतले जात असून साक्षरतेची जेष्ठ नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे काही गावांमध्ये शाळेत जाणारी छोटी मुलं आपली आजी पण संध्याकाळी शाळेत जातीय, शिकतीय हे बघून आजीला शाळेत सोडवणे, तिच्या दप्तराची तयारी करून घेणे, घरी आल्यावर ती शाळेत काय काय शिकलीय याकडे आवर्जून लक्ष देत आहेत. काही नातवंडं तर आजीच्या बरोबरीने अभ्यासाला बसतात आणि आजीला काही अडत असेल तर त्या ठिकाणी विशेष ममत्वाने ती अडचण दूर करायचा प्रयत्न करतात. हे चित्र खेड तालुक्यातील विविध गावांत उर्मी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रौढ साक्षरता वर्गाच्या माध्यमातून सर्वत्र दिसत आहे. या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.