देशाला मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
एमआयटीतर्फे सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान

पुणे :” सध्या देशाला मूल्याधिष्ठित शिक्षणाची खूप गरज आहे. त्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड यांनी चालविलेला उपक्रमाची संपूर्ण माहिती सरकारला देऊन मार्गदर्शन करावे. जेणे करून शहरी व ग्रामीण क्षेत्रात चारित्र्यवान आदर्श विद्यार्थी घडेल.”असे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे या संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या “विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड अध्यात्म-विज्ञानाधिष्टीत वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती २०२५” मधील सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित सोहळ्यात त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी बालभारतीचे विशेष अधिकारी डॉ.अजयकुमार लोळगे हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच माईर च्या महासचिव व एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, सोलापूरच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड चाटे, एमआयटी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे व परीक्षेचे मुख्य समन्वयक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण हे उपस्थित होते.
डॉ. पंकज भोयर म्हणाले,” राज्यात १ लाख ८ हजार शाळा आहेत. त्यात ६५ हजार शासकीय शाळा असून तेथे विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. आदर्श शाळा निर्माण करून उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परिस्थितीवर मात करण्याची विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवावी. तसेच कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे लक्षात ठेवावे.” असा सल्ला त्यांनी दिला.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले,” चारित्र्यसंवर्धन आणि जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी वैश्विक मूल्यांचा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम, बौद्धिकदृष्ट्या कुशाग्र, आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आणि नैतिकदृष्ट्या चारित्र्यसंपन्न आणि शिस्तप्रिय असावे. असे युवक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून जगभर ओळखले जातील. नैतिक मूल्यांची शिकवण देऊन भारतीय संस्कृती, पंरपरा आणि तत्वज्ञान भावी पिढीला समजावून सांगावे लागणार आहे.”
डॉ.अजयकुमार लोळगे म्हणाले,” श्रृती, स्मृती, कृती हे विद्यार्थी जीवनात सर्वात महत्वाचे तत्व आहे. याचा दैनंदिन जीवनात वापर करावा. मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे मुले ऐकत नाही हा शब्द यापुढे ऐकू येणार नाही.”
प्रा.स्वाती कराड चाटे म्हणाल्या,”छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श घेऊन मूल्यावर्धीत शिक्षण घेण्याचे धडे गिरवावेत. शिक्षण हे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या संस्कारातून समाज प्रगतीपथावर जातो. शिक्षणाच्या आधारावरच डॉ. विश्वनाथ कराड यांनी विश्वशांतीसाठी जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती केली आहे. तसेच मानवतातीर्थ रामेश्वर रूई या गावाचा कायापालट केला आहे.”
डॉ. एस.एन.पठाण यांनी या उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच प्रस्तावनेत सांगितले की नैतिक मूल्ये मुलांच्या मनात रूजविणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत बदल होतो. उत्तम चारित्र्य हीच जीवनाची खरी संपत्ती आहे.
यावेळी विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात सोहम संग्राम गंभीरे यांने मनोगत व्यक्त केले.
सुप्रिया होले यांनी सूत्रसंचालन केले. सौ. देवयानी पालवे यांनी आभार मानले.
राज्यस्तरीय विजेतेपदाबरोबरच पश्चिम विभाग, मराठवाडा विभाग व विदर्भ विभाग अशा तीन विभागांतून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवा अशी बक्षिसे देण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे
पश्चिम महाराष्ट्र विभागः सोहम संग्राम गंभीरे (प्रथम, संत ज्ञानेश्वर विद्यालय, कोथरूड, पुणे), दर्शन सतीश जगदाळे (द्वितीय,विश्वशांती गुरुकुल, पंढरपूर), आर्य सचिन लोखंडे (तृतीय, अभिनव विद्यालय, पुणे), पायल संदीप बोरुडे(चतुर्थ, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरूर), वेदिका संतोष बडे (पाचवा, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरुर )
मराठवाडा विभागः अथर्व अमोल वाघचौरे (प्रथम, कै. दादाराव कराड विद्यालय, अंबाजोगाई), वैभवी तातेराव लहाडे (द्वितीय, श्री सरस्वती विद्यालय, रामेश्वर रूई), आर्या सचिन गडदे (तृतीय, कै. दादाराव कराड विद्यालय,अंबाजोगाई), सुरज विश्वंबर गायकवाड (चतुर्थ, मुकुंदराज विद्यालय, नांदगाव), दिव्या विलास धांडे (पाचवी, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, रांजणगाव)
विदर्भ विभागः गौरी गोपाळ मुंडोकार(प्रथम, श्री शिवाजी विद्यालय,अकोट), पयोष्णी विजय पार्शिवकर (द्वितीय, जनता विद्यालय, पूर्णानगर), सह्याद्री अरविंद कळसकर (तृतीय, जनता विद्यालय, पूर्णानगर), स्वराज नितीन बंड (चतुर्थ , जनता विद्यालय,पूर्णानगर), वैभवी नंदकिशोर अकोटकर (पाचवा, श्री शिवाजी विद्यालय, अकोट )