उत्कर्ष ग्लोबल फौंडेशनतर्फे वारकऱ्याना कापडी पिशव्या, स्टीलच्या पाणी बाटल्यांचे वाटप पर्यावरण दिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद

आषाढीच्या वारीत यंदा अशीही एक दिंडी सहभागी झाली होती जी विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची सेवाही करत होती आणि प्लास्टिकच्या अनावश्यक वापराबाबत जनजागृतीही करत होती. ही दिंडी “उत्कर्ष ग्लोबल फौंडेशन” या सेवाभावी संस्थेची होती. वारीच्या वाटेवर पडलेल्या प्लास्टिक बाटल्याही स्वयंसेवकांनी गोळा केल्या व त्यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली.०१० साली स्थापन झालेली ही संस्था पर्यावरण रक्षण, जीवनोपयुक्त शिक्षण आणि विकासात समाज सहभाग या क्षेत्रात कार्यरत आहे.
उत्कर्ष फौंडेशनच्या ६० स्वयंसेवकांची ही दिंडी १८ जून रोजी देहूहून निघाली. वरवण येथे हे स्वयंसेवक वारीत सहभागी झाले. येथे संस्थेच्या वतीने प्लास्टिकच्या अतिवापरामुळे आणि प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे होत असलेल्या पर्यावरण हानीबाबत कीर्तन सादर करण्यात आले. प्लास्टिकच्या गैरवापरामुळे होणाऱ्या पर्यावरांच्या नुकसानीबाबत जनजागृती करणारे कळसूत्री बाहुल्यांचे सादरीकरण बारामती येथे स्वयंसेवकांनी केले. उत्कर्ष ग्लोबल फौंडेशनच्या दिंडीत पर्यावरणाचा कर्दनकाळ ठरत असलेल्या प्लास्टिकचे प्रतिकात्मक भूत मोठ्या बुजगावण्याच्या रुपात चालत होते.उत्कर्ष ग्लोबल फौंडेशनचे स्वयंसेवक तुळशीची रोपे घेऊन चालत होते. स्वयंसेवकांनी २०-२५ ठिकाणी वारकऱ्यासोबत मुक्काम घेतला. प्रत्येक मुक्कामी स्वयंसेवक वारकऱ्यांचे पाय चेपणे, मालीश करणे अशी सेवा करत होते. वारीच्या मार्गावर सहा ठिकाणी सामुहिक प्रतिज्ञेचा कार्यक्रम घेण्यात आला. आम्ही प्लास्टिकच्या वापरास आळा घालू, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळू, प्लास्टिकच्या वस्तूंची योग्यप्रकारे विल्हेवाट लावू अशी प्रतिज्ञा वारकऱ्यांनीही घेतली.दिंडीची सांगता पारंपरिक वारीसोबत ६ जुलै रोजी पंढरपुरात झाली. संपूर्ण वारीत उत्कर्ष ग्लोबल फौंडेशनतर्फे ५ लाख वारकऱ्यांना स्टीलच्या पाणी बाटल्या वाटण्यात आल्या. सोबतच ५ लाख कापडी पिशव्यांचेही वाटप वारकऱ्यांना करण्यात आले. गेल्या वर्षी उत्कर्ष ग्लोबल फौंडेशनतर्फे ५ लाख कापडी पिशव्यांचेही वाटप वारकऱ्यांना करण्यात आले होते आणि अडीच लाख स्टीलच्या पाणी बाटल्या वाटण्यात आल्या होत्या, त्यातूनच ही प्लास्टिकचा अतिवापर टाळण्या बाबत जनजागृती करण्याची कल्पना सुचली असे संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष अॅड. दगडू लोंढे यांनी सांगितले. तेही दिंडीत सहभागी झाले होते.कुंभमेळ्यात २५ लाख कापडी पिशव्यांचेही वाटप करण्यात आले तसेच आयोध्या येथे या पिशव्या अत्यल्प दरात विक्री करणाऱ्या २५० स्वयंचलित मशीन्स बसविण्यात आल्या होत्या, अशी माहितीही अॅड. दगडू लोंढे यांनी दिली. वारीत उत्कर्ष ग्लोबल फौंडेशनच्या दिंडीस मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे महाराष्ट्रात प्लास्टिक वापराबाबत जागृती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्कर्ष ग्लोबल फौंडेशनच्या उपक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बहुमोल सहकार्य लाभले, असेही त्यांनी सांगितले.