आयबीएसएफ जागतिक १७ आणि २१ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेसाठी आरव संचेती भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार !!
महाराष्ट्रातून निवड झालेला एकमेव खेळाडू !!

पुणे. बाहरीन येथील मनामा येथे आंतरराष्ट्रीय बिलीयर्डस् आणि स्नुकर फेडरेशन (आयबीएसएफ) तर्फे आजपासून सुरू झालेल्या आयबीएसएफ जागतिक १७ आणि २१ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघामध्ये पुण्याच्या आरव संचेतीची निवड झाली आहे. भारतीय संघामध्ये निवड झालेला आरव हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू असून १४ वर्षीय आरव हा संघातील सर्वात लहान खेळाडू आहे.
भारतीय संघामध्ये आरव (महाराष्ट्र) याच्यासह भाव्य पिपालिया (गुजरात), आरव जयद (कर्नाटक), राहूल विल्यम्स् (तामिळनाडू) आणि वैभव चढ्ढा (तेलंगणा) यांचा समावेश आहे. अशोक शांडिल्या हे संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पहाणार आहेत. बाहरीन येथील मनामा येथे आजपासून (१५ जुलै) सुरू झालेली ही स्पर्धा २४ जुलैला संपणार आहे.
आरव हा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्नुकर आणि बिलीयर्डस् खेळाडू सचिन संचेती यांचा मुलगा असून आपल्या वडीलांप्रमाणेच त्याने या क्यु स्पोर्ट्स प्रकारात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. भारतीय (राष्ट्रीय) सब-ज्युनिअर २०२४ स्नुकर आणि बिलीयर्डस् गटात क्रमांक १ तसेच महाराष्ट्र (राज्यस्तरीय) सब-ज्युनिअर गटात क्रमांक १ असे आरवचे मानांकन आहे.
आरव हा यासिन मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली ॲमानोरा फन क्लब येथे सराव करतो. एनआयओएस या खुल्या शालेय अभ्यासक्रमांतर्गत तो सध्या दहावी परीक्षेची तयारी करत आहे. २०२३ मध्ये झालेल्या आयबीएसएफ जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेतसुद्धा आरव सहभागी झाला होता. ही स्पर्धा रियाध, सौदी अरेबिया येथे झाली होती.